पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा जागा वाढणार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहा महाविद्यालयांची भर पडली असून प्रवेशासाठीच्या जागांमध्ये एक ते दोन हजार जागा वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. गेल्या वर्षी २८७ महाविद्यालयांमध्ये मिळून ९७ हजार ४३५ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. यंदा दहा महाविद्यालये वाढल्याने २९७ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. तसेच काही महाविद्यालयांच्या तुकडय़ांना मान्यता मिळाल्यास त्या जागांची भर पडेल. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत जागा वाढणार आहेत.

‘यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी दहा महाविद्यालये वाढली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणखी एक ते दोन हजार अधिक जागा उपलब्ध असतील. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येईल,’ असे केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

प्रवेश प्रक्रिया लांबणार?

दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर दोन-तीन दिवसांत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होते. प्रवेश अर्जाचा भाग २ भरण्यास सुरुवात होते. मात्र यंदा दहावीचा निकाल घटल्याने राज्य मंडळाचे विद्यार्थी प्रवेशांमध्ये मागे पडतील अशी चर्चा सुरू झाल्याने सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी नवे सूत्र आणण्याचा मुद्दा पुढे आला आहे. त्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्न करत असल्याने अद्याप अकरावीच्या प्रवेशांसाठीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तसेच आणखी दोन-तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया काहीशी लांबण्याची शक्यता आहे.

७० हजार ९४१ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील ७० हजार ८४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग १ भरला आहे. त्यापैकी ३१ हजार २१७ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली असून, २३ हजार ३६९ विद्यार्थ्यांचे अर्ज संगणकीय पद्धतीने (ऑटो व्हेरिफाइड) पडताळले गेले आहेत. तर १६ हजार ३५५ विद्यार्थ्यांच्या अर्जाची अद्याप पडताळणी झालेली नाही.