‘घराजवळ किंवा सहलीला गेल्यावर प्राण्यापक्ष्यांना खायला घालणे, बागेत पक्ष्यांसाठी पाणी भरुन ठेवणे, झाडांवर कृत्रिम घरटी लावणे, तलावांच्या काठी वृक्षारोपण करणे या गोष्टी वरवर पाहता निसर्गसंवर्धक वाटल्या तरी पुरेशा ज्ञानाअभावी त्या स्थानिक परिसंस्थेसाठी नवीन प्रश्नच निर्माण करणाऱ्या ठरतात. काही परिस्थितीत निसर्गासाठी काहीही न केल्यामुळेच निसर्गाचे संरक्षण होते. या दृष्टीने पर्यावरणवाद्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची साक्षरता येणे गरजेचे आहे,’ असे मत पर्यावरण अभ्यासक किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.
बायोस्फिअर्स संस्थेतर्फे ‘पर्यावरण साक्षरता आणि सक्षमीकरण’ या विषयावर रविवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. नदी अभ्यासक सारंग यादवडकर, अॅड. असीम सरोदे, पर्यावरण अभ्यासक अनिल खैरे, शेखर नानजकर, ‘परिसर’ संस्थेचे रणजित गाडगीळ, जैविक भूगोलाचे अभ्यासक डॉ. संजीव नलावडे, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, बायोस्फिअर्स संस्थेचे डॉ. सचिन पुणेकर या वेळी उपस्थित होते.
पुरंदरे म्हणाले, ‘कोणत्याही प्राण्यापक्ष्याला खायला घालू नका, तसेच पक्ष्यांसाठी पाणीही ठेवू नका. पाण्याअभावी पक्षी मरणार नाहीत, फार तर ते त्या ठिकाणाहून दुसरीकडे जातील. पक्ष्यांची कृत्रिम घरटी लावण्यासाठी आज पर्यावरणप्रेमींमध्ये स्पर्धा लागली असून या घरटय़ांचा पक्ष्यांना काहीही उपयोग होत नाही. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित तलावांच्या भोवती पक्ष्यांना जमिनीवर उतरण्यासाठी मोकळ्या जागा गरजेच्या असतात, त्यामुळे तिथे झाडे लावण्याची गरज नसते.’
लिमये म्हणाले, ‘यापूर्वी काही ठिकाणी गवताळ प्रदेशात झाडे लावण्याची वन विभागाने केलेली चूक सुधारण्याचा आता प्रयत्न होत असून नान्नज, रेहेकुरी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर असलेली ग्लिरिसिडिया वनस्पती काढली जात आहे.’ यादवडकर यांनी सांगितले की, शहरात जेमतेम ४० ते ५० टक्के मैलापाण्यावर प्रक्रिया होत असून उर्वरित मैलापाणी नदीत जाऊन उजनीला मिळते. बांधकामात निघालेला राडारोडा नदीपात्रात टाकण्याचा प्रश्नही मोठा आहे. गाडगीळ म्हणाले, ‘शहराच्या वाहतूक समस्येवर उपाय योजायचे असतील तर वाहनांवर र्निबध आणणे गरजेचे असून रस्ते मोठे करणे, पार्किंग सुविधा वाढवणे हा त्यावरील उपाय नाही. रस्त्यावर वाहने वाढल्यावर रस्ते मोठे केले जातात, त्यानंतर ठराविक काळानंतर रस्त्यांवर पुन्हा गर्दी होते.’ निसर्ग पर्यटन करताना निसर्ग हाच त्याचा केंद्रबिंदू असणे आवश्यक असून आपल्याला शहरात जे करता येत नाही ते जंगलात जाऊन करायचे आणि धुमाकूळ घालायचा, ही व्याख्या चुकीची असल्याचे नानजकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘पर्यावरणवाद्यांमध्येच हवी पर्यावरणाबद्दलची साक्षरता!’
पर्यावरणवाद्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची साक्षरता येणे गरजेचे आहे,’ असे मत पर्यावरण अभ्यासक किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.

First published on: 13-07-2015 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seminar by biosphere institute