शहरात चारचाकी व दुचाकी खासगी वाहन घेणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याबरोबरच प्रत्यक्ष चाचणी घेण्याची नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीमध्ये अनेक त्रुटी असल्याने परवाना मिळविण्यासाठी येणाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याचप्रमाणे चाचणी घेण्याची क्षमता कमी असल्यानेही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएसनने आवाज उठविला असून, याबाबत संघटनेने बुधवारी आरटीओ कार्यालयात आंदोलनही केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शिकाऊ वाहन परवाना देण्यासाठी १ सप्टेंबरपासून ऑनलाईन अपॉईंटमेंट घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. शहरामध्ये दररोज मोठय़ा प्रमाणावरील उमेदवार शिकाऊ वाहन परहवाना मिळण्यासाठी अर्ज करीत असतात. मात्र, एका दिवसातील चार बॅचमध्ये केवळ शंभर उमेदवारांचीच परवान्यासाठी चाचणी घेण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना केवळ ऑनलाईन अपॉईंटमेंट न मिळाल्याने पुढील तारखेची वाट पहावी लागते. शिकाऊ वाहन परवाना मिळविणाऱ्यांची संख्या वाढत असताना प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची संख्याही वाढत चालली आहे.
ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्यासाठी संकेतस्थळावरील सदरात अर्ज भरत असताना हा अर्ज सेव्ह न झाल्यास पुन्हा पहिल्यापासून अर्ज भरावा लागतो. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रणालीवर भार येऊन ती बंद होण्याचे प्रकारही होतात. त्याचप्रमाणे या प्रणालीमध्येही विविध त्रुटी आहेत. त्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरटीओ कार्यालयात जाण्यापूर्वीच या तांत्रिक अडचणीतून उमेदवारांना जावे लागते. शिकाऊ वाहन परवान्यासाठी घेण्यात येणारी ऑनलाईन चाचणी परीक्षेतही अनेक त्रुटी आहेत. ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या दाव्यानुसार प्रश्नावलीमध्येच अनेक त्रुटी असल्याने अनेक उमेदवार नापास होतात.
या सर्व घोळांचा फटका नव्याने परवाना काढणाऱ्यांबरोबरच ड्रायव्हिंग स्कूलला बसत असल्याने संघटनेच्या वतीने बुधवारी आरटीओ कार्यालयात गांधीगिरीचे आंदोलन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांना गुलाबपुष्प देण्याबरोबरच यंत्रणा सुधारणेबाबत निवेदन देण्यात आले. मोटार ड्रायव्हींग स्कूल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुंभार, अध्यक्ष राजू घाटोळे, सचिव निलेश गांगुर्डे, उपाध्यक्ष चांगदेव मासाळ, विठ्ठल मेहता, पिंपरी- चिंचवडमधील अध्यक्ष अनंत कुंभार, ऑल इंडिया ट्रान्सपोर्टचे सदस्य बाबा शिंदे, बाबा धुमाळ, रिक्षा संघटनेचे बादशहा सय्यद, बापू भावे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंत्रणेतील सुधारणांसाठी मागण्या

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sevior problems in online learning license procedure
First published on: 30-10-2014 at 03:30 IST