पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात मुख्याध्यापकाने १५ वर्षीय विद्यार्थावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ६८ वर्षीय मुख्याध्यापक मोहम्मद अली याला कामशेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. ही गंभीर घटना एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली असून तिथे वसतिगृह देखील आहे.

दरम्यान, याच वसतिगृहात दहा दिवसांपूर्वी केअरटेकर रसूल याने १४ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याच घटनेचा तपास करत असताना कामशेत पोलिसांना दुसऱ्या एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं समोर आलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत परिसरात असणाऱ्या वसतिगृहात ज्यांना आई वडील नाहीत असे मुले शिक्षण घेतात, तसेच तिथे राहण्याची देखील सोय आहे. दरम्यान, केअरटेकर रसूल याने एका १४ वर्षीय वसतिगृहातील मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलाला नातेवाईक घरी घेऊन गेले होते. तेव्हा, ही गंभीर घटना नातेवाईकांना मुलाने सांगितली होती. तात्काळ नातेवाईकांनी कामशेत पोलिसात तक्रार दिली आणि केअरटेकर रसूल ला जेरबंद केले. परंतु, कामशेत पोलिसांची वसतिगृहातील मुलांकडे चौकशी सुरू होती तेव्हा अन्य एका १५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली.

त्यानुसार घटनेचा अधिक तपास केला असता यात मुख्याद्यापक मोहम्मद अली हाच गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याने १५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झाल. कामशेत पोलिसांनी अली याला अटक केली असून रसूल आणि मुख्याद्यापक मोहम्मद अली हे दोघे ही येरवडा कारागृहात आहेत. दोन्ही घटना या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात घडल्या असल्याचं कामशेत पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करत आहेत.