पुणे : केंद्र सरकार अनेक गोष्टींची हमी (गॅरंटी) देत आहे. मात्र त्यांच्या हमीला तारीख नाही आणि धनादेशही वठत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.गेल्या सत्तर वर्षांत अनेक राज्यकर्ते पाहिले. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार पाहिले. मात्र गेल्या दहा वर्षांत मोदी यांची भूमिका देशाला दिशा देणाऱ्या व्यक्तींविषयी जनतेच्या मनात घृणा निर्माण करण्याची आहे. त्यामुळे लोकशाहीची चिंता वाटत आहे. नेहरू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ले करण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम मोदी यांचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

इंडिया आघाडीचा पहिला मेळावा शनिवारी काँग्रेस भवनात झाला. या मेळाव्यात पवार यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, खासदार सुप्रिया सुळे, चंद्रकांत हंडोरे, आमदार रवींद्र धंगेकर, डाॅ. विश्वजित कदम, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजनान थरकुडे उपस्थित होते.

हेही वाचा >>>शाब्बास पुणे पोलीस !… गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून २५ लाखांचे रोख बक्षीस

पवार म्हणाले की, सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी केला जात आहे. विरोधी विचारावर घाव घालण्याचे काम सुरू आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी भविष्यातील संकटांची माहिती सामान्य माणसाला द्यावी लागणार असून भाजप विरोधी सर्व विचारधारांना त्यासाठी एकत्र यावे लागेल.

देशाच्या विकासात भरीव योगदान असलेल्यांवर मोदी हल्ला करत असल्याचे त्यांच्या भाषणातून दिसते. नेहरू यांनी देश प्रगतीच्या पथावर नेला, हे संपूर्ण जग मान्य करत आहे. मात्र मोदींना ते अमान्य आहे. राज्यकर्ते सामान्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहेत, असे वाटत नाही. देशाला पोसणारा शेतकरी संकटात आहे. दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन सुरू आहे. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेहरू, गांधी आणि वाजपेयी यांचे सरकार असताना केंद्र आणि राज्यात समन्वय होता. मात्र गेल्या दहा वर्षांत राज्यांचा सन्मान केला जात नाही. त्यातच एखाद्या राज्यातील विचारधारा वेगळी असेल तर वेगळी भूमिका घेतली जाते. त्यामुळे प्रश्नही प्रलंबित राहत आहेत. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, अनिल देशमुख, संजय राऊत यांना झालेली अटक ही कसा त्रास द्यायचा, याची उदाहरणे आहेत, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणेकरांनो, रविवारी भाज्या जास्त खरेदी करा…का? वाचा सविस्तर

पटोले म्हणाले की, यंदा हुकूमशाही सरकार पराभूत होईल. सांविधानिक मूल्यांची मोडतोड करून राज्यातील सरकार सत्तेवर आले आहे. शेतकऱ्यांनी मोदींना सत्तेत आणले मात्र त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मोदींची हमी म्हणून खोटे बोलण्याची हमी आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केला जात आहे. धनगर समाजाचीही फसवणूक केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या सरकारला अरबी समुद्रातील शिवस्मारक करता आलेले नाही. विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप करायचे आणि त्यांना पक्षात घ्यायचे, असे भाजपचे धोरण आहे. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र येऊन देश आणि संविधान वाचविण्याचे काम करावे लागणार आहे.

आरोपांची श्वेतपत्रिका काढावी

ज्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन भाजपला सत्तेवर आणले, ते आज कुठेच दिसत नाहीत. सत्तेच्या पंगतीत भलतेच जेवताना दिसत आहेत. ज्यांनी अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनीच चव्हाणांना भाजपमध्ये घेतले. भाजपने पक्ष, घरे तर फोडलीच, त्यासोबत पेपरही फोडण्याचे काम केले. देवेंद्र फडणवीस यांनी आजवर जे आरोप केले, त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

देशाला जे काय मिळाले ते गेल्या दहा वर्षांतच मिळाले, असे खोटे सांगण्याचे काम केले जात आहे. जे स्वातंत्र्य लढ्यात कुठेही नव्हते तेच लोक आज स्वातंत्र्य लढ्यातील गांधी नेहरूंचे योगदान काय, असा प्रश्न विचारत आहेत. ही लढाई अस्तित्वाची आहे. आपणास लोकशाही सोबत राहायचे आहे की हुकूमशाहीसोबत हे ठरवण्याची वेळ आलेली आहे, असे सचिन अहिर यांनी सांगितले.

रामदास आठवले यांनी भाजपची साथ सोडावी, नाही तर आंबेडकरी जनता त्यांना जागा दाखवेल. प्रकाश आंबेडकर यांनीही राज्यातील सर्व जागा जिंकण्याचा किमान समान कार्यक्रम ठेवावा, असे आवाहन चंद्रकांत हंडोरे यांनी केले.

माजी उपमहापौर आबा बागुल अनुपस्थित

या मेळाव्यात माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून माजी नगरसेवक आबा बागुल यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे आणि पक्ष संघटनेत विश्वासात घेतले जात नसल्यामुळे ते मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दिसली.