लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून ‘शरद पवार’ निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता ‘शरद पवार’ निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पुण्यातील ‘बघतोय रिक्षावाला’ या संघटनेने पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये बारामती मतदारसंघातून ‘शरद पवार’ नावाच्या एका रिक्षाचालकाला उमेदवारी देण्यात आली आहे. यासह पुण्यातून टेम्पो चालक असलेले मनोज वेताळ, मावळमधून कॅब चालक संतोष वालगुडे आणि शिरूरमधून फूड डिलिव्हरी बॉय स्वप्नील लोंढे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारांच्या प्रचारार्थ १८ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, शासकीय कोषागाराजवळ दुपारी १२ वाजता प्रचारसभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती देखील बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव नाना क्षीरसागर यांच्याकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा-सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल

रिक्षा, टेम्पो, कॅब चालक आणि फूड डिलिव्हरी बॉय या व्यवसायातील कामगारांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षांना गांभीर्य नाही. आम्ही मतदानाद्वारे आमचे आंदोलन मतपेटीतून पुढे नेत आहेत. या चार लोकसभा मतदार संघातील चार लाख गिग वर्कर्स आणि त्यांचे १६ लाख कुटुंबीय आमच्या उमेदवारांना मतदान करून आमची ताकद राजकीय पक्षांना दाखवून देऊ, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.