शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी देशातील प्रमुख गाडय़ांना स्वतंत्र वातानुकूलीत बोग्या जोडण्यात याव्या, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री के. जे. सूर्यप्रकाश यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदनही देण्यात येणार आहे.
पुण्यात येणाऱ्या शेतीमालापैकी सुमारे ७० टक्के शेतीमाल बाहेरच्या राज्यांमध्ये जातो. या मालाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेच्या स्वतंत्र बोग्या नसल्याने अनेक अडचणी येतात. या मालाची ट्रकने वाहतूक करावी लागते. डिझेल आणि पेट्रोलच्या दरांमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो. तसेच खराब रस्त्यांमुळे मालाची आदळआपट होऊन २५ ते ३० टक्के माल खराब होतो. हे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते. रेल्वेने वाहतूक केल्यास माल वेळेत पोहचेल व नुकसान होणार नाही, त्यामुळे पुण्यातून देशाच्या चारही कोपऱ्यात जाणाऱ्या प्रमुख गाडय़ांना स्वतंत्र बोग्या जोडाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.