शिवसेनेचे पिंपरी विधानसभेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे बंधू सुनील चाबुकस्वार यांनी स्वत:च्या मुलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितल्याने  सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. आमदार परिवारातील हा ‘गृहकलह’ आहे की राजकीय खेळीचा भाग, याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. पिंपरीगाव-पिंपरी कॅम्प प्रभागात (क्रमांक २१) अनुसूचित महिला प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे. या जागेसाठी सुनील चाबुकस्वार यांना कु. आलिशा हिला रिंगणात आणायचे आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन इच्छुक म्हणून तिचा अर्ज दाखल केला. पक्षप्रवक्ते फजल शेख यांनी तो अर्ज स्वीकारला. सुनील चाबुकस्वार यांनी यापूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. आमदार चाबुकस्वार हे काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चाबुकस्वार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते आमदार झाले. आगामी निवडणुकीसाठी आमदार चाबुकस्वार शिवसेनेची ‘फिल्डिंग’ लावत असताना त्यांचे बंधू मात्र राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागत आहे. आमदारांची पुतणी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षांत आहे. तिला शिवसेनेकडून उमेदवारी मिळणे फारसे अवघड नाही. मात्र, तिच्यासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी मागण्यात आली. यामागच्या कारणाविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.