शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी चिंचवडला झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांना राष्ट्रवादीने त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. सुभेदारी आणि थैलीशाहीची संस्कृती राष्ट्रवादीत नसून शिवसेनेतच आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.
सोमवारी चिंचवडला झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार राऊतांनी शेलक्या शब्दात राष्ट्रवादीवर टीका केली. राष्ट्रवादीला काही सोनं लागलेले नाही. ते केवळ पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकतात. राष्ट्रवादीचे मोगलांप्रमाणे सरदार आहेत. ते आपल्या लोकांना गुलाम बनवितात. थैलीशाही हीच त्यांची कार्यपद्धती आहे, अशी टीका त्यांनी केली, त्यास राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांच्या आरोपात बिलकूल तथ्य नाही. शिवसेनेत काय चालते, याचा भंडाफोड माजी खासदार गजानन बाबर यांनी यापूर्वीच केला आहे, त्याचे सेना नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे. पैसे घेऊन तिकीट देण्याची संस्कृती राष्ट्रवादीत नाही, तर शिवसेनेत आहे. शरद पवार, अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये भरीव विकासकामे झाली आहेत. २०१७ साठी शिवसेनेने कितीही वल्गना केल्या तरी विकासाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादीचीच पुन्हा पालिकेत सत्ता येणार आहे, असे वाघेरेंनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘सुभेदारी आणि थैलीशाहीची संस्कृती शिवसेनेचीच’
शिवसेनेत काय चालते, याचा भंडाफोड माजी खासदार गजानन बाबर यांनी यापूर्वीच केला आहे, त्याचे सेना नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे.
First published on: 16-07-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ncp political