पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केलेले संजोग वाघेरे हे गेल्या ४० वर्षांपासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू साथीदार असलेले; पण मागील दोनवेळा उमेदवारीपासून डावलले गेल्याने वाघेरे हे यावेळी ठाकरे गटामध्ये सामील झाले. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाल्यास वाघेरे विरुद्ध बारणे अशी कडवी झुंज मावळमध्ये होणार आहे.

वाघेरे यांना घरातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. मूळचे काँग्रेसमध्ये असलेले वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे हे पिंपरीगावाचे सरपंच, तसेच शहराचे महापौर होते. स्वतः संजोग हेही काँग्रेसकडून महापौर तर पत्नी उषा वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने पिंपरीगावात वास्तव्यास असलेले संजोग वाघेरे हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. दहा वर्षांपासून त्यांची तयारी सुरू होती. पण, संधी मिळत नव्हती. २०१४ आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना वाघेरे यांना लोकसभेची निवडणूक खुणावत होती. मात्र, २०१४ मध्ये राहुल नार्वेकर आणि २०१९ मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने त्यांना ही इच्छा मनातच ठेवावी लागली. त्यावेळी वाघेरे यांनी माघार घेतली होती.

हेही वाचा >>> शिवाजीराव आढळरावांच्या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशानंतर ‘शिरूर’मध्ये आता शब्दिक युद्ध

मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही संधी साधत वाघेरे यांनी ३० डिसेंबर २०२३ रोजी ठाकरे गटात प्रवेश केला. वाघेरे यांनी डिसेंबरमध्ये प्रवेश केला असला तरी निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी खूप आधीपासूनच सुरू केली होती. वाघेरेंच्या घरात राजकारण जुने नाही. त्यांचे वडील भिकू वाघेरे पाटील पिंपरीगावचे सरपंच होते. त्यांच्या वडिलांनी १९८६ मध्ये काँग्रेसकडून शहराचे महापौरपद भूषविले होते. संजोग यांनाही काँग्रेसकडून १९९५ ते १९९६ दरम्यान शहराचे महापौरपद भूषविण्याची संधी मिळाली. तीनवेळा पिंपरीगावचे संजोग यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले. पवार कुटुंबीयांशी घनिष्ठ संबंध असलेल्या वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग सहा वर्षे ते शहराध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे याही राजकारणात सक्रिय आहेत. पंधरा वर्षांपासून त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका आहेत. त्यांनी पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. तसेच महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी पद भूषविले आहे. नगरसेवकाच्या निवडणुकीनंतर थेट लोकसभेच्या निवडणुकीला वाघेरे सामोरे जात आहेत.

हेही वाचा >>> सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक

महायुतीचे उमेदवारी गुरुवारी जाहीर होणार?

मावळच्या जागेवर महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्यामुळे उमेदवारीचा तिढा वाढला होता. परंतु, मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहणार असून, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जाते. आज (२८ मार्च) त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेससह मित्र पक्षांच्या सहकार्याने हा बालेकिल्ला अभेद्य ठेवणार आहे. मावळ मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी माझा लढा आहे, असल्याची प्रतिक्रिया संजोग वाघेरे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली.