चकचकीत फलाट.. स्वयंचलित तिकीट यंत्रणा.. गाडय़ांबाबत माहिती देणारी अद्ययावत व्यवस्था.. प्रवाशांना उपयुक्त अशा सर्व सुसज्ज सुविधा.. अशा सर्व व्यवस्था एखाद्या रेल्वे स्थानकावर निर्माण होणे ही बाब सद्य:स्थितीत स्वप्नवत वाटेल, पण पुढील काळात रेल्वेच्या शिवाजीनगर स्थानकात या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. खासगी, नागरी सहभागातून देशातील पाच स्थानकांचा विकास करण्यात येणार असून, त्यात शिवाजीनगर स्थानकाचा समावेश आहे. स्थानकाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून, पुढील तीनच महिन्यामध्ये या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत.
खासगी नागरी सहभागातून रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाकडून आखण्यात आली आहे. विकास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असणाऱ्या व शहराचा भाग असणाऱ्या विभागातील रेल्वे स्थानकांचा त्यासाठी अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सुरुवातीला देशातील पाच स्थानकांची निवड करण्यात आली. त्यात शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला. इतर स्थानकांमध्ये चंदीगड, दिल्लीतील आनंद विहार, बिजवसन व भोपाळमधील हबीबगंज या स्थानकांचा समावेश आहे.
शिवाजीनगर रेल्वे स्थानक शहरातील दुसरे महत्त्वाचे स्थानक आहे. लांब पल्ल्याच्या अनेक महत्त्वाच्या गाडय़ा या स्थानकावर थांबतात. त्याचप्रमाणे पुणे- लोणावळा लोकल व पुणे- मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक महत्त्वाचे आहे. स्थानकाच्या लगतच रेल्वेची जागाही आहे. त्या दृष्टीने या स्थानकाच्या विकासाचा आराखडा मध्य रेल्वेकडून नुकताच तयार करण्यात आला. हा आराखडा रेल्वेच्या पुणे विभागाकडे पाठविण्यात आला होता. स्थानिक परिस्थिती व इतर गरजा लक्षात घेता या आराखडय़ामध्ये काही बदल करण्यात आले असून, तो पुन्हा मध्य रेल्वेकडे पाठविण्यात आला आहे. या आराखडय़ाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तीन महिन्यांमध्येच या कामाच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आराखडय़ानुसार रेल्वे स्थानकालगत पुणे- मुंबई महामार्गाच्या दिशेने दोन व्यावसायिक इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार विकसकाकडून रेल्वे स्थानकामध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येतील. फलाट, पादचारीपूल आदींच्या कामांबरोबरच प्रवाशांसाठी स्वयंचलित तिकीट यंत्रणा बसविण्यात येणार आहे. परकीय चलन विभाग, प्रवासी माहिती विभाग, गाडय़ांच्या माहितीसाठी डिजिटल यंत्रणा, प्रवासी प्रतीक्षालय आदींचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे.