दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात नकाशे चुकल्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भूगोल विषयाच्या अभ्यासमंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातील भारताच्या नकाशामधून अरुणाचल प्रदेश वगळण्यात आला होता. याबाबत ‘लोकसत्ता’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. हे पुस्तक तयार करणाऱ्या भूगोल विषयाच्या अभ्यासमंडळाच्या सदस्यांवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कारवाई सुरू केली आहे. अभ्यास मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले, ‘‘अभ्यास मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी अभ्यास मंडळाचे जे सदस्य दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीने सध्या कार्यवाही सुरू आहे.’’