scorecardresearch

अनाथांचा सांभाळ करणाऱ्या सिंधुताईंचे कार्य अतुलनीय – पाटील

स्वकीयांच्या प्रेमाला पारखे झालेल्या हजारो अनाथांचा आईप्रमाणे सांभाळ करून त्यांची माय झालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे कार्य अतुलनीय आहे.

अनाथांचा सांभाळ करणाऱ्या सिंधुताईंचे कार्य अतुलनीय – पाटील

स्वकीयांच्या प्रेमाला पारखे झालेल्या हजारो अनाथांचा आईप्रमाणे सांभाळ करून त्यांची माय झालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे कार्य अतुलनीय आहे, असे गौरवोद्गार सिक्कीचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी बुधवारी काढले.
सन्मती बाल संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे अनाथ आणि उपेक्षित बालकांच्या संगोपनाचे काम करणाऱ्या सिंधुताईंचा गौरव महापालिकेतर्फे बुधवारी खास मानपत्र देऊन करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. महापौर चंचला कोद्रे आणि राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सपकाळ यांना सन्मानित करण्यात आले. उपमहापौर बंडू गायकवाड, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, नगरसेवक आबा बागूल, माधुरी सहस्रबुद्धे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. काकडे यांनी मानपत्राचे वाचन आणि प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.
अनाथ मुलांना पोटाशी धरून त्यांना मायेची ऊब देतानाच अशा मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे सिंधुताईंचे कार्य मोलाचे आणि अतुलनीय आहे, असे पाटील यांनी या वेळी सांगितले.
अनाथांसाठी कार्य करत असताना माझे आतापर्यंत अनेक सत्कार झाले; पण ज्या गावात माझी संस्था आहे, त्या ठिकाणी माझा सत्कार झाल्यामुळे मला मायेचा हात मिळाला आहे. त्यामुळे हा सत्कार मला मोलाचा वाटतो, असे सपकाळ यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-10-2013 at 02:43 IST

संबंधित बातम्या