पुण्यातील कोंढव्यासारखी संरक्षक भिंत कोसळण्याची दुर्घटना सिंहगड कॅम्पसमध्ये घडली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला जाब विचारला आहे. कोंढवा दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि पुणे महानगरपालिकेने काही बोध घेतला नाही का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे.

कोंढवा पाठोपाठ आता सिंहगड कॅम्पसमध्ये असाच प्रकार घडला असून काही मजूरांचा यात बळी गेला आहे. त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. संरक्षक भिंती, घरे, निर्माणाधीन इमारतींची पाहणी करुन मजूरांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवा अशी मागणीही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

काय घडलं सिंहगड कॅम्पसमध्ये
सिंहगड कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यृ झाला आहे. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत.

शनिवारी पुण्यातल्या कोंढवा भागात आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा दुसरी दुर्घटना घडून त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ठार झालेले मजूर छत्तीसगढचे रहिवासी आहेत असेही समजते आहे.