पुणे : उत्तर-दक्षिणेकडील राज्यांतील तापमानात पुढील २४ तासांनंतर काही प्रमाणात घट होणार असल्याने राज्यातही तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्याच्या उत्तर भारतात काही भागांत दिवसाचे तापमान पुढील चार ते पाच दिवस सरासरीच्या पुढेच राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात आणखी दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तरेकडील उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे राज्यांत गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. राजस्थानमध्ये उष्णतेची अतितीव्र लाट कायम आहे. हिमाचल प्रदेशापासून दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट कायम आहे. मात्र, या भागातील कमाल तापमानात १२ एप्रिलपासून २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मात्र, उष्णतेच्या लाटेची स्थिती मध्य प्रदेशात काही भागांत कायम राहणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपुढे राहील. उर्वरित महाराष्ट्रात दोन ते तीन दिवस तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. सोमवारी विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.७ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. बुलढाणा वगळता इतरत्र तापमान अद्यापही ४० अंशांपुढे आहे. मराठवाडय़ात सर्वच ठिकाणी ४० अंशांपुढे कमाल तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आदी भागांत कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली असून, ते ४० अंशांखाली आले आहे. मुंबईसह कोकणात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2022 रोजी प्रकाशित
राज्यातील तापमानात किंचित घट शक्य; कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाळी स्थिती
उत्तर-दक्षिणेकडील राज्यांतील तापमानात पुढील २४ तासांनंतर काही प्रमाणात घट होणार असल्याने राज्यातही तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-04-2022 at 02:52 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slight decrease temperature state possible rainy conditions konkan central maharashtra amy