सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगळी व्यवस्था, हात धुवायला बेसिन अशा ‘स्मार्ट’ सुविधा असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्या हातगाडीला ‘एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळाले आहे. अन्न व औषध प्रशासन आणि ‘मिशन सेफ फूड इंडिया’ यांनी ही हातगाडी बनवली आहे.
रविवारी पिंपरीत झालेल्या कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या गाडीचे औपचारिक अनावरण करण्यात आले. अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे या वेळी उपस्थित होते. एफडीएच्या फेब्रुवारीत झालेल्या कार्यशाळेत या गाडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते.
पूर्णत: स्टेनलेस स्टीलच्या बनवलेल्या या हातगाडीमध्ये काही नवीन सुविधांचा समावेश केल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार सानी अवसरमल यांनी दिली. ते म्हणाले,‘‘हातगाडीवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला असून येणाऱ्या ग्राहकांना १० मिनिटे मोफत वायफाय वापरता येईल अशीही सोय केली आहे. तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थाचे बिल ‘ऑनलाईन’ भरण्यासाठी अॅप सादर करण्यात आले आहे. वडापाव विक्रेत्यांसारख्या लहान व्यावसायिकांकडे ग्राहकांना अशा सुविधा मिळणे मोठी गोष्ट ठरेल. हातगाडीच्या पुढच्या भागात गाडीचे नाव व तत्सम माहिती लिहिलेला ‘एलईडी ब्रँडिंग बोर्ड’देखील बसवण्यात आला आहे.’’
हॉटेल व्यवसायातील तज्ज्ञांनी बनवलेली ही हातगाडी नेहमीच्या हातगाडीपेक्षा थोडय़ा मोठय़ा आकाराची आणि विशिष्ट प्रकारची चाके व छप्पर असलेली आहे. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी व्यवस्था, ‘हँड सॅनिटायझर’, एका दिवसासाठीचे ओले व सुके पदार्थ साठवण्यासाठी वेगळी जागा, अग्निशमनासाठी ‘फायर एक्िंस्टग्विशर’, गाडीच्या वर लहान आकाराची टाकी, हात धुवायला नळ व बेसिन, बेसिनचे वापरलेले पाणी जमा करण्यासाठी वेगळी टाकी अशा नाना सोई त्यात करण्यात आल्या आहेत. या हातगाडीची किंमत मात्र ७१ हजार रुपयांपासून पुढे असून वैशिष्टय़पूर्ण सुविधांसाठी प्रत्येकी ५ ते ७ हजार रुपये अतिरिक्त भरावे लागतील, असेही अवसरमल यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart cart asia book of world records
First published on: 19-04-2016 at 03:20 IST