सापाच्या विषाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पिंपरी पोलिसांनी वल्लभनगर एसटी स्थानकाजवळ सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एक लिटर सापाचे विष जप्त करण्यात आले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत दोन कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे विष गोव्यातून आणल्याचे आरोपी सांगत आहेत.
मोहंमद सलीम शेख (वय ३०, रा. नानुस, गोवा), सुरेश किसनराव क्षीरसागर (वय ४५, रा. शेळके कॉलनी, फुलेवाडी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याचे हवालदार शाकीर जेनेडी यांना दोन व्यक्ती सापाचे विष विक्रीसाठी वल्लभनगर एसटी स्थानक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन विधाते व त्याच्या पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. त्याच्याकडे पोलिसांना दोन कोटी रुपयांचे एक लिटर सापाचे विष मिळाले. हे सापाचे विष आहे याची खात्री एका कंपनीकडून घेण्यात आली आहे. तरीही त्याचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. हे जप्त केलेले विष वन विभागाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. या दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हे विष गोव्यातून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. मात्र, पुण्यात ते कोणाला विकणार होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.