गर्भवती स्त्रियांच्या सोनोग्राफी तपासणीवेळी भरून घेतल्या जाणाऱ्या ‘एफ फॉर्म’मधील त्रुटींबद्दल डॉक्टरांना होणाऱ्या शिक्षेच्या विरोधात पुणे व परिसरातील सोनोग्राफी चालकांनी सोमवारपासून तीन दिवस सोनोग्राफी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर बुधवारी (९ डिसेंबर) सोनोग्राफीबरोबरच एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी अशा सर्व रेडिओलॉजी सेवा बंद राहणार असल्याची माहिती ‘इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन’च्या पुणे शाखेने दिली आहे.
पुण्यातील एका डॉक्टरला ‘गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्या’नुसार पुरेशी माहिती न पुरवल्याबाबतच्या खटल्यात नुकतीच एक वर्षांचा कारावास आणि ३२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली गेली. सोनोग्राफी केंद्रचालकांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून या कायद्यात सुधारणा आवश्यक असल्याची मागणी केली आहे. संपाच्या कालावधीत शहरातील काही रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक रेडिओलॉजी सेवा पुरवल्या जातील असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. वीरेन कुलकर्णी यांनी कळवले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची पुणे शाखा आणि स्त्रीरोगतज्ज्ञांचाही संपास पाठिंबा असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
अस्थिरोगतज्ज्ञांच्या संघटनेचाही पाठिंबा!
अस्थिरोगतज्ज्ञांच्या ‘पुणे ऑर्थोपेडिक असोसिएशन’चाही या संपाला पाठिंबा असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. नितीन भगली यांनी दिली. ‘अपघातग्रस्त रुग्णांच्या शरीरातील अवयवांना कितपत मार लागला आहे हे पाहण्यासाठी केली जाणारी सोनोग्राफी तसेच शस्त्रक्रियेपूर्वी भूल देताना रुग्णाच्या हृदयाची क्षमता तपासण्यासाठी केला जाणारी ‘टू-डी एको कार्डिओग्राम’ चाचणी यासाठी पूर्वी ‘पोर्टेबल’ सोनोग्राफी उपकरणे वापरली जात. परंतु पीसीपीएनडीटी कायद्यानुसार दोन वर्षांपूर्वी या उपकरणांचा वापर बंद झाला. या चाचण्यांची सोय नसणाऱ्या लहान स्पेशालिटी रुग्णालयात तातडीच्या वेळी दाखल होणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांची पोर्टेबल उपकरणाअभावी गैरसोय होते,’ असे डॉ. भगली यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2015 रोजी प्रकाशित
सोनोग्राफी चालक संपावर!
सोनोग्राफी तपासणीवेळी भरून घेतल्या जाणाऱ्या ‘एफ फॉर्म’मधील त्रुटींबद्दल होणाऱ्या शिक्षेच्या विरोधात सोनोग्राफी चालकांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 07-12-2015 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonography centre strike