प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार अनंत झांजले यांनी भारतातील विविध भागांमधील वाघांची माहिती संकलित करता यावी यासाठी एका वेगळ्या मोहिमेचे आयोजन केले आहे. मोहीम ९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून मोहिमेदरम्यान भारतातील ४४ आणि नेपाळमधील २ व्याघ्र प्रकल्पांना भेटी देण्यात येणार आहेत.
मोहिमेसाठी या सर्व प्रकल्पांची नऊ भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मोहिमेमध्ये आठ जण सहभागी होणार आहेत. ते एकूण १६० ते १७० दिवस जंगलांमध्ये वास्तव्य करणार आहे. सुमारे ३० ते ३५ हजार कि.मी.चा टप्पा या वेळी पार करण्यात येईल. मोहिमेमध्ये भारतातील १७ राज्ये, हिमालय, आरवली, अण्णामलाई, निलगिरी, सह्य़ाद्री, विंध्य, शिवालिक आणि मिझो हिल्स आदी पर्वतरांगा आणि गंगा, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, कावेरी, गोदावरी आणि नर्मदा या नद्यांची खोरी या भागांचा समावेश करण्यात आला आहे.
स्थानिक लोकांना तसेच आदिवासींना त्यांचे जीवन आणि संस्कृतीविषयी माहिती संकलित करण्यासाठी सहभागी करून घेणार असल्याचे झांजले यांनी सांगितले. त्या त्या भागातील प्रशासकीय अधिकारी तसेच माहुत, सेवक यांसारख्या लोकांशी चर्चा करून माहितीपट बनविण्यात येणार आहे. याद्वारे अधिकाऱ्यांनी केलेले काम आणि खालच्या पातळीवरील लोकांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तेथील लोकांना इतर प्राण्यांविषयीची माहिती देण्यासाठी स्लाइड शो दाखविण्यात येणार आहे. मोहिमेमध्ये संकलित होणारी माहिती एकत्र करून त्याचे पुस्तक काढणार आहे, जेणेकरून देशातील वाघांविषयीची माहिती सर्वाना उपलब्ध होईल, असे झांजले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special project for collection information about tigers in india by anant zanjale
First published on: 30-10-2013 at 02:50 IST