शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले आणि कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नसल्याचे नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी स्पष्ट केले आहे. स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्यात यावे यासाठी अडवणूक करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा परदेशी यांनी दिला आहे.
स्टॅम्प पेपर मिळत नसल्यामुळे कागदपत्रे मिळवण्यात आणि प्रवेशाच्या प्रक्रियेत अडचणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. प्रवेशासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसाठी वापरण्यात येणारे दहा किंवा वीस रुपयांचे स्टॅम्प पेपर मिळत नसल्याची तक्रार आहे. या तक्रारीची दखल घेत जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्रासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांवरील मुद्रांक शुल्क शासनाने २००४ मध्ये माफ केले आहे. त्यामुळे या कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपरवर हमीपत्र देण्याची आवश्यकता नाही, असे परदेशी यांनी स्पष्ट केले.
विविध कागदपत्रांसाठी साध्या कोऱ्या कागदावर केलेला अर्ज मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र, अर्जदाराकडे आवश्यक ती कागदपत्रे आणि पुरावे असणे गरजेचे आहे. किंबहुना निवडणूक काळातही उमेदवारांनी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही. स्टॅम्प पेपर नाही म्हणून अडवणूक करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे स्टॅम्प पेपरसाठी अडवणूक करण्यात येत असेल, तर मुद्रांक आणि नोंदणी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stamp paper declaration shrikar pardeshi
First published on: 27-07-2014 at 03:00 IST