पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आमची आणि शिवसेनेची एकच भूमिका आहे. घटनेच्या चौकटीत पारदर्शकतेच्या मुद्द्यावर ज्या तरतुदी आहेत. त्या मान्य करण्याची आमची तयारी आहे. त्याचबरोबर जनतेनेही पारदर्शकतेच्या सूचना पाठवाव्यात. त्यांचा समावेश केला जाईल. मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर चर्चा होत राहील; पण आम्ही सरकारमध्ये सत्तेसाठी किंवा पदासाठी नाही, तर सत्यासाठी आहोत, अशी भूमिका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत मांडली.

पुणे विभागीय आढावा बैठकीसाठी आलेल्या अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे हेही उपस्थित होते. राज्य सरकारच्या कारभारात पारदर्शकता असावी, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला आहे. याच मुद्द्यावर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या पारदर्शकतेच्या सूचना मान्य असून आमची लढाई ही महापौरपदाच्या खुर्चीसाठी कधीही नव्हती. ती केवळ पारदर्शकतेसाठी होती, असे ते म्हणाले. यंदा कृषी क्षेत्राबरोबरच रोजगार आणि कौशल्य विकासावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार आहे. रोजगारासंदर्भात जिल्हास्तरावर काम व्हावे. त्यादृष्टीने कौशल्य विकास केंद्रे स्थापन व्हावीत, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यापुढे विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांनाही स्थान द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे. ज्याप्रमाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पत्रकार आणि विरोधी पक्षनेत्यांना स्थान दिले जाते. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीतही स्थान दिले जावे, अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली होती. भाजपने ज्या पारदर्शकतेची मागणी मुंबई महापालिकेत केली आहे, तीच पारदर्शकता राज्य सरकारच्या कारभारातही असावी. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकार, लोकायुक्त आणि विरोधी पक्षनेते उपस्थित असावेत, असा शिवसेना नेत्यांचा आग्रह आहे.