एसटीच्या हिरकणी बसमधूनही आता प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. आसनांवर बसल्यानंतर पाठीमागे काहीसे रेलता येईल, अशा पद्धतीची ‘पुश बॅक’ प्रकारातील आसने बसविलेल्या हिरकणी बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. अशा प्रकारची पहिली बस दादर- पुणे मार्गावर धावली.
राज्याचे परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते या नव्या सेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या कालावधीत एसटीच्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा व सोई देण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून एसटीच्या हिरकणी बसच्या सेवेतही आरामदायीपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पुश बॅक प्रकारातील आसने बसविलेल्या १५ हिरकणी बस राज्याच्या विविध भागात मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. या वर्षांच्या अखेपर्यंत अशा प्रकारच्या सुमारे पाचशे बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. आरामदायी आसनांची सुविधा देण्यासाठी बसमधील एकूण आसनांची संख्या ३९ वरून ३५ झाली आहे. मात्र, नव्या आसनव्यवस्थेच्या सुविधेतून प्रवाशांना आकृष्ट करून ही घट भरून काढण्याचा एसटीचा प्रत्न आहे. सुविधेत वाढ झाली असली, तरी हिरकणीच्या तिकिटाच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onबसBus
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State transport bus push back hirkani
First published on: 27-06-2015 at 03:03 IST