लोकसत्ता वार्ताहर

लोणावळा : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर मावळ तालुक्यातील आढे गावाजवळ एक खासगी प्रवासी बस टायर फुटल्याने अचानक पेट घेऊन लागलेल्या आगीमध्ये जळाली. या बसमध्ये ३६ प्रवासी होते. प्रसंगवधान राखत सर्व प्रवासी आणि चालक बसमधून बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

आणखी वाचा-पुण्यातील वाहतूक कोंडीवर अनोखा उपाय! रस्त्यावर धावणार दुचाकी रुग्णवाहिका

मिळालेल्या माहितीनुसार बस पुण्याच्या दिशेने जात असताना टायर फुटला व त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्याने बसला आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावर गावांना जोडणाऱ्या पुलाखाली ही घटना घडल्याने पुलावर काही काळ धुराचा लोट उसळला होता.