scorecardresearch

पिंपरी-चिंचवडमध्ये ४० टक्के पाण्याची गळती व चोरी

शहरातील ३० ते ४० टक्के पाण्याची गळती व चोरी होत असल्याची कबुली देत पाणीचोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये ४० टक्के पाण्याची गळती व चोरी

पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून आयुक्तांसह पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकाऱ्यांचा निषेध करून मंगळवारी स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली. शहरातील ३० ते ४० टक्के पाण्याची गळती व चोरी होत असल्याची कबुली देत पाणीचोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत कठोर भूमिका घेणारे आयुक्त पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराच्या बाबतीत हतबल का आहेत, असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.
चऱ्होलीतील पाणीटंचाईच्या निषेधार्थ मागील सभा अर्धा तास तहकूब केली होती. मंगळवारी शहरातील अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या निषेधार्थ पुन्हा सभा तहकूब करण्यात आली. नवनाथ जगताप अध्यक्षस्थानी होती. महेश लांडगे, चंद्रकांत वाळके, अविनाश टेकवडे, विनया तापकीर, आशा शेंडगे, सुनीता वाघेरे, माया बारणे आदींनी पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारावर हल्लाबोल केला. धो-धो पाऊस पडतोय, १०० टक्के धरणे भरली, तरी पाणी मिळत नाही. पाण्याचे दर वाढवले. मात्र, मुबलक पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अकार्यक्षम ठरले आहेत. आयुक्तांचा धाक राहिलेला नाही, असे अनेक मुद्दे सदस्यांनी उपस्थित केले. पिंपरी पालिकेच्या जलवाहिन्यांवरून आळंदीतील नागरिकांनी अनधिकृत नळजोड घेतले असून ते मोठय़ा प्रमाणात पाण्याची चोरी करत आहेत, याकडे सदस्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख महावीर कांबळे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदस्यांचे समाधान न झाल्याने आयुक्तांनी खुलासा केला. ते म्हणाले, पाण्याचे मीटर ही गरज असली तरी त्यात दोष आहेत. जवळपास ३० ते ४० टक्के पाण्याची गळती तसेच चोरी होती, ती थांबवण्याची गरज आहे. पाण्याची चोरी आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले.
भोसरीला झुकते माप, लगतच्या गावांवर अन्याय
महापौर मोहिनी लांडे व आमदार विलास लांडे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या भोसरीत दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, लगतच्या दिघी-चऱ्होलीत दिवसातून एकदाही पुरेसे पाणी मिळत नाही, अशी तक्रार चंद्रकांत वाळके यांनी केली. केवळ पाणीच नव्हे तर अन्य सेवा-सुविधा पुरवतानाही भोसरीला झुकते माप देत अन्य गावांशी दुजाभाव केला जातो, असे ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2013 at 02:38 IST

संबंधित बातम्या