बालेवाडी येथील रूपाली अपार्टमेन्टमध्ये संगणक अभियंता असलेल्या तरुणाने सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.
आशुतोष शर्मा (वय ३०, रा. बालेवाडी, मूळगाव-वाराणसी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील एका कंपनीत आशुतोष हा संगणक अभियंता म्हणून काम करत होता. तो बालेवाडी येथील रुपाली अपार्टमेन्टमधील सदनिकेत एकटाच राहात होता. सोमवारी दुपापर्यंत तो बाहेर न आल्यामुळे शेजाऱ्यांनी आवाज दिले. पण, त्याने दरवाजा न उघडल्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याचे लॅपटॉप व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. नागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षला ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच औंध पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आशुतोषच्या आत्महत्येबाबत त्याच्या पालकांना कळविण्यात आले आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. एन. वाळेकर हे अधिक तपास करत आहेत.