निवडणूक टाळून २५ सदस्यांची बिनविरोध निवड करणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेने कार्यकारिणीही बिनविरोध केली असून शाखेच्या अध्यक्षपदी सुरेश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. बिनविरोध होण्यासाठी माघार घेणाऱ्यांपैकी काहींना स्वीकृत सदस्य आणि सन्माननीय सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले आहे.
नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब भोईर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्यासह सुनील महाजन आणि समीर हंपी हे नियामक मंडळ सदस्य या बैठकीस उपस्थित होते.
नाटय़ परिषदेची नवनिर्वाचित कार्यकारणिी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष – दादा पासलकर, अविनाश देशमुख, प्रमुख कार्यवाह – दीपक रेगे, कोशाध्यक्ष – मेघराज राजेभोसले, संयुक्त कार्यवाह – मकरंद टिल्लू, निकिता मोघे, कार्यकारिणी सदस्य – डॉ. सतीश देसाई, कीर्ती शिलेदार, विजय वांकर, शुभांगी दामले, प्रमोद आडकर, दीपक काळे, अरुण पोमण, सत्यजित धांडेकर, स्वीकृत सदस्य – राज काझी, प्रवीण बर्वे, संतोष चोरडिया, नंदू बांदल, अशोक जाधव, सन्माननीय सदस्य- शशिकांत कुलकर्णी, प्रकाश पायगुडे, प्रदीपकुमार कांबळे, कार्यालय प्रमुख- प्रभाकर तुंगार.
नाटक पाहणाऱ्यांची टक्केवारी वाढविणार
शहराच्या चारही टोकांपर्यंत नाटय़ परिषदेचे कार्य पोहोचविण्याचा मानस असून नाटक पाहणाऱ्यांची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रसिकांनी नाटय़गृहाकडे वळावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सुरेश देशमुख यांनी सांगितले. शासन आणि महापालिकेच्या मालकीच्या नाटय़गृहांमध्ये घरगुती दराने वीजआकारणी करावी यासाठी राज्य सरकारकडे विनंती करणार असून ही मागणी मान्य झाल्यावर नाटकाच्या तिकिटाचे दर कमी करण्यासाठी नाटय़निर्मात्यांकडे आग्रह धरणार आहे. पडद्यामागच्या कलाकारांसाठी गृहप्रकल्प आणि अधिकाधिक गरजू कलाकारांना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.