पुण्यातील जंगली महाराज रस्ता बॉम्बस्फोटाच्या संबंधात दिल्ली पोलिसांनी अटक केलेला आरोपी सय्यद मकबूल ऊर्फ झुबेर (रा. धर्माबाद, नांदेड) याने बिहार येथील बोधगया मंदिरामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारेच गुप्तचर विभागाने या मंदिरातील संभाव्य हल्ल्याबाबत सतर्कतेच्या इशारा दिला होता. तरी सुद्धा रविवारी सकाळी या मंदिरातच नऊ बॉम्बस्फोट झाले आहेत.
गेल्या वर्षी एक ऑगस्ट रोजी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटाचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उलगडा केला. या प्रकरणी सुरुवातीस त्यांनी इमरान खान वाजिद पठाण (नांदेड), इरफान लांडगे (वय ३२, रा. अहमदनगर), असद खान जमशेदअली खान (वय ३३, रा. औरंगाबाद), फिरोज ऊर्फ हुमजा अब्दुल हमीद सय्यद (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, पुणे) या चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर सय्यद मकबूल याला दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या गुन्ह्य़ात अटक केली. या सर्वाकडे तपास केल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील दिलसुखनगर भागाची रेकी केल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर बिहार येथील बोधगया मंदिरात फिदाईन दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे दिल्ली पोलिसांना सांगितले होते.
या आरोपींनी सांगितलेल्या हैदराबाद येथील दिलसुखनगर भागात फेब्रुवारी महिन्यांपूर्वी बॉम्बस्फोट झाले. त्याच बोधगया मंदिराच्या परिसरात रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे सय्यद मकबूलची या प्रकरणी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. मकबूलने पुणे बॉम्बस्फोटातील आरोपींना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. मात्र, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला पुणे बॉम्बस्फोटात त्याच्या विरुद्ध काहीच पुरावे न मिळाल्यामुळे यामध्ये आरोपी केलेले नसल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
पुण्यात बंदोबस्तात वाढ
बिहार येथील बोधगया मंदिरामध्ये बॉम्बस्फोटानंतर पुण्यात ही अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पुण्यात रविवारी पोटनिवडणूक असल्यामुळे बंदोबस्त तैनात असून महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त माने यांनी दिली.