आजारात जरा बरे वाटले की चालू असलेली औषधे थांबवायची हा अगदी पावलोपावली दिसणारा शिरस्ता आहे. पण ‘टॅमी फ्लू’ गोळ्यांच्या बाबतीत असे दुर्लक्ष करणे त्रासाचे ठरू शकते या गोष्टीकडे आरोग्य खाते आणि अन्न व औषध प्रशासनाने लक्ष वेधले आहे. अँटिबायोटिक औषधांचे डोस अर्धवट सोडल्यानंतर जीवाणू त्या औषधांविरोधात जसे बंडखोर होतात तसाच टॅमी फ्लूचा डोस मध्येच थांबवल्यावर विषाणू या गोळ्यांना दाद देणे थांबवू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
तापाच्या रुग्णाची लक्षणे पाहून तो स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण असल्याचे दिसून आल्यास त्याच्या स्वाईन फ्लू चाचणीची वाट न पाहता त्याला टॅमी फ्लूच्या गोळ्या सुरू केल्या जात आहेत. यात खरोखरीचा स्वाईन फ्लू नसलेल्या तापाच्या रुग्णालाही टॅमी फ्लू दिले जाऊ शकते. ‘या गोळ्यांचा सर्वसाधारण कोर्स पाच दिवसांचा असून एकदा टॅमी फ्लू घेतले की डॉक्टरांनी दिलेला डोस रुग्णांनी पूर्ण करायला हवा,’ याकडे आरोग्य खात्याच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना लक्ष वेधले.
‘ऑसेलटॅमीविर’ या औषधाला ‘टॅमी फ्लू’ या ब्रँड नावाने ओळखले जाते. २००९ मध्ये ‘रोच’ ही एकच कंपनी हे औषध तयार करत असल्यामुळे ‘टॅमी फ्लू’ हेच औषधाचे नाव प्रचलित झाले. ससून सवरेपचार रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. कदम म्हणाले, ‘‘‘सीझनल इन्फ्लुएन्झा’, ‘एच १ एन १ इन्फ्लुएन्झा’, ‘पॅरॅइन्फ्लुएन्झा ए’, ‘पॅरॅइन्फ्लुएन्झा बी’ यापैकी कोणत्याही फ्लूमध्ये ‘ऑसेलटॅमीविर’ घेतल्यावर बरे वाटते. साधा इन्फ्लुएन्झा असलेल्या रुग्णाला या औषधाने लवकर बरे वाटत असले तरी रुग्णाने या गोळ्यांचा पाच दिवसांचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे, म्हणजे विषाणू ‘रेझिस्टंट’ होणार नाही व या गोळ्यांना दाद देणे थांबवणार नाही.’’
ऑसेलटॅमीविर हे ‘शेडय़ूल एक्स’मधील औषध आहे. नशा आणणारी काही औषधे शेडय़ूल एक्समध्ये मोडत असून ही औषधे विकण्यासाठी औषधविक्रेत्याला अन्न व औषध प्रशासनाचे विशेष प्रमाणपत्र घ्यावे लागते.
नागरिकांनी भीतीपोटी टॅमी फ्लू खरेदी करून ठेवू नये
– अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश
औषध विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एस. एस. मोहिते म्हणाले, ‘‘टॅमी फ्लू हे प्रतिबंधक औषध नव्हे. त्यांचा ‘रेझिस्टन्स’ निर्माण होऊ शकतो. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवे. गोळ्यांचा तुटवडा पडण्याच्या भीतीने ओळखीच्या डॉक्टरांकडून टॅमी फ्लूचे प्रिस्क्रिप्शन मिळवून गोळ्या आणून ठेवण्याकडे काही नागरिकांचा कल असतो. टॅमी फ्लूचा पुरेसा पुरवठा उपलब्ध असून त्याचा विनाकारण साठा करू नये.’’
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
‘टॅमी फ्लू’ घेतलेत तर त्याचा डोस पूर्ण करा!
आजारात जरा बरे वाटले की चालू असलेली औषधे थांबवायची हा अगदी पावलोपावली दिसणारा शिरस्ता आहे. पण ‘टॅमी फ्लू’ गोळ्यांच्या बाबतीत असे दुर्लक्ष करणे त्रासाचे ठरू शकते.

First published on: 27-02-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamiflu dose doctor fdi