कर्वेनगर येथील एका शाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली आहे.
सायबू हिरू राठोड (वय ३९, रा. राज पार्क, नवी सांगवी) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार बाल लैंगिक अत्याचार अधिनियम १० आणि भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हा कर्वेनगर येथील एका शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षक म्हणून कामाला आहे. त्याने शाळेतील चौदा वर्षांच्या दोन विद्यार्थिनींशी मैदानावर अश्लील चाळे केले. याची तक्रार त्या मुलींनी वरिष्ठांकडे केल्यानंतर राठोडच्या विरुद्ध तक्रार देण्यात आली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी राठोडला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाईक हे करत आहेत.