राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात पहिली ते पाचवीच्या शिक्षकांना ब्रिज कोर्स बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रिज कोर्स नसलेल्या उमेदवारांना आता शिक्षक म्हणून नियुक्तीच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना शिक्षक म्हणून संधी मिळत होती. तर पुढील दोन वर्षांत सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स करण्याची मुभा होती. मात्र, आता पात्रतेच्या निकषात सुधारणा करण्यात आल्याने नंतर ब्रिज कोर्स करण्याची संधी दिली जाणार नाही. तर नियुक्तीवेळीच सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे.

शिक्षकांचे विषयज्ञान विकसित करण्यासाठी ब्रिज कोर्स करणे बंधनकारक आहे. मात्र, शिक्षकांकडून या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शासनाने ब्रिज कोर्स पूर्ण असलेल्या उमेदवारांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने प्राथमिक शिक्षकांना ब्रिज कोर्स अनिवार्य केला आहे. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय मुक्त विद्यालयी संस्थेच्या (एनआयओएस) माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने करता येतो.

शिक्षक भरती प्रक्रियेचे काय?

पवित्र संकेतस्थळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पहिली ते पाचवीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षक भरती पूर्ण झाली आहे. पण आता या सुधारित निर्णयानंतर उर्वरित शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत ब्रिज कोर्स बंधनकारक असल्यास भरती प्रक्रियेचे काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.