९ आणि १६ ऑगस्टला उमेदवारांची निवड यादी
राज्यात पवित्र संकेतस्थळाच्या गोंधळासह अनेक तांत्रिक अडचणींमध्ये खोळंबलेल्या बहुचर्चित शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. शिक्षक भरतीतील अंतिम निवड यादीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पवित्र पोर्टलवर दिलेल्या सूचनांनुसार मुलाखतीशिवाय ९ ऑगस्ट, तर मुलाखतीसह उमेदवारांची निवड यादी १६ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सरकारी अनुदानित, खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळांतील १२ हजार पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जवळपास गेल्या दीड वर्षांपासून ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र, जागांची संख्या, आरक्षण, संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणी यात भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. या पाश्र्वभूमीवर शिक्षण विभागाकडून निवड यादी जाहीर करण्याबाबतची घोषणा पवित्र संकेतस्थळावर करण्यात आली.
पवित्र संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनेनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि काही खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी मुलाखती न घेता थेट निवड यादी ९ ऑगस्टला जाहीर करण्यात येईल.
काही संस्थांमध्ये मुलाखतीसह प्राधान्यक्रम नोंदवलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीसाठीची निवड यादी १६ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांना पवित्र संकेतस्थळावर त्यांच्या लॉगिनवर ‘रिपोर्ट’ या मेनू अंतर्गत सिलेक्?शन स्टेटसमध्ये माहिती मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवड यादी जाहीर करा
पवित्र संकेतस्थळावर शिक्षक भरतीच्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याची तारीख प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांची यादी उमेदवारांपुरतीच न ठेवता सर्व उमेदवार, शाळा व्यवस्थापन, पालक, अधिकारी या सर्वाना पाहता येण्यासाठी संकेतस्थळावर खुली करण्याची मागणी करण्यात आली आहे.