नियोजित वेळापत्रकानुसार बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम सोमवारपासून (२५ फेब्रुवारी) सुरू होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र शिक्षकांच्या मूल्यमापनावरील बहिष्कारामुळे  बारावीच्या उत्तरपत्रिका अजून मूल्यमापनाच्या प्रतीक्षेत पडून आहेत. राज्यातील अनेक विभागीय मंडळांमध्ये शिक्षकांनी मूल्यमापनासाठी उत्तरपत्रिका स्वीकारण्यास नकार दिला आहे.
कोणत्याही अडचणी न येता बारावीची परीक्षा सुरळीत सुरू झाली असली तरी उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचा प्रश्न अजून कायम आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम २५ फेब्रुवारीपासून सुरू होणे अपेक्षित होते. उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बहिष्कार टाकला आहे. राज्याभरातील शिक्षकांनी मूल्यमापनासाठी उत्तरपत्रिका स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका गोदामात पडून आहेत. कोल्हापूर, अमरावती, नाशिक या विभागांमध्ये मुख्य नियामक, वरिष्ठ नियामकांच्याही बैठका होत नसल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.
यावर्षी देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याच्या पाश्र्वभूमीवर प्रवेशांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सर्व बोर्डाना ५ जूनपूर्वी बारावीचे निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मूल्यमापनाच्या कामावर शिक्षकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे निकालाला विलंब होऊ शकतो. या पाश्र्वभूमीवर मूल्यमापनाच्या कामावर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांबाबत शासन काय पावले उचलणार याबाबत शैक्षणिक वर्तुळात उत्सुकता आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले,‘‘मूल्यमापनासाठी उत्तरपत्रिकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आता मूल्यमापनाची नेमकी परिस्थिती काय आहे ते लगेच सांगता येऊ शकत नाही. मात्र या परिस्थितीवर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onएचएससीHSC
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers strike answer sheets dumped in godowns
First published on: 26-02-2013 at 01:05 IST