९० टक्के  धरण दुरुस्तीचा ‘जलसंपदा’चा दावा फोल

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील अन्य तीन धरणांपैकी टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक २४८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अन्य तिन्ही धरणे १०० टक्के  भरली असताना टेमघर धरण अद्यापही ८५ टक्के च भरले आहे. तसेच या धरणातून अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे या धरणाची ९० टक्के  गळती रोखण्यात आल्याचा जलसंपदा विभागाचा दावा फोल ठरला आहे. दरम्यान, पुढील दुरुस्तीसाठी हे धरण डिसेंबरमध्ये रिकामे करण्यात येणार आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा के ला जातो. अन्य तिन्ही धरणे १०० टक्के  भरली आहेत. मात्र, टेमघर धरण अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. या धरणाची साठवण क्षमता ३.७१ अब्ज घनफू ट (टीएमसी) आहे. सध्या हे धरण ३.१९ टीएमसी भरले आहे. वरसगाव आणि पानशेत या धरणांची साठवण क्षमता अनुक्रमे १२.८२ टीएमसी आणि १०.६५ टीएमसी आहे. या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात टेमघर धरणक्षेत्रापेक्षा कमी पाऊस होऊनही ही धरणे १०० टक्के  भरली आहेत. या पाश्र्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून टेमघर धरणाची ९० टक्के  गळती रोखण्यात यश आल्याचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुळशीतील लव्हार्डे येथे टेमघर धरणाचे बांधकाम २००० मध्ये सुरू करण्यात आले. २०१०-११ पासून या धरणात पाणीसाठा करण्यात येत आहे. मात्र, सन २०१७ मध्ये धरणाला गळती असल्याचे समोर आल्यानंतर धरण दुरुस्तीचे काम सुरू आहे. धरण दुरुस्तीचे काम केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या (सीडब्ल्यू अ‍ॅण्ड पीआरएस) मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांचे मौन

टेमघर धरण अद्यापही का भरू शकले नाही? ९० टक्के  गळती खरोखरच रोखली गेली आहे किं वा कसे?  याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगणे पसंत के ले. टेमघर धरणाची जबाबदारी सध्या कु कडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता एच. टी. धुमाळ यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्याकडे प्रभारी कार्यभार असल्याने त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

धरणे           साठवण                 आतापर्यंतचा

                   क्षमता                   पाऊस

                     (टीएमसी)         (मि.मी.)

टेमघर                ३.७१             २४८९

वरसगाव              १२.८२           १७८७

पानशेत               १०.६५           १८६७

खडकवासला         १.९७             ६४०