संपूर्ण शहरात ‘चोवीस तास-सातही दिवस’ पाणी देण्याची योजना राबवण्यापूर्वी काही प्रभागांमध्ये ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार असून त्यासाठी सहकारनगर-पद्मावती आणि राजस सोसायटी (कात्रज) हे प्रभाग निवडण्यात आले आहेत. या दोन प्रभागांमध्ये ही योजना राबवण्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या असून त्यानंतर प्रत्यक्ष योजनेसंबंधीची कार्यवाही सुरू केली जाईल.
चोवीस तास पाणी देण्याची ही योजना गेली तीन वर्षे शहरात चर्चेत असली, तरी सर्व पक्षांनी या योजनेला एकमुखी मान्यता दिलेली नाही. या योजनेतून नक्की काय साध्य होणार तसेच पाण्याचा वापर कमी होणार का, नागरिकांना किती पैसे द्यावे लागणार याबाबत अद्यापही अनिनिश्चतता असल्यामुळे तूर्त पाच प्रभागांमध्ये ही योजना राबवावी असा निर्णय झाला आहे. त्यासाठी कात्रज, नागपूर चाळ, भवानी पेठ, पद्मावती आणि विमाननगर हे भाग निवडण्यात आले आहेत. मात्र, या पाचही प्रभागांमध्ये ही योजना सुरू न करता सध्यातरी दोन प्रभागांसाठीचीच निविदा महापालिका प्रशासनातर्फे काढण्यात आली आहे. उर्वरित तीन प्रभागांसाठी दोन टप्प्यांमध्ये निविदा काढली जाईल.
कात्रज आणि सहकारनगर या दोन प्रभागांसाठी काढण्यात आलेली निविदा साडेतीन कोटींची असून त्यासाठी या दोन प्रभागांमध्ये पाण्यासाठीचे दोन हजार मीटर बसवले जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावरील पाच प्रभागांमध्ये ही योजना राबवण्याची प्रक्रिया या वर्ष अखेरीस पूर्ण होईल, असे महापालिकेचे अधिक्षक अभियंता (पाणीपुरवठा विभाग) व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. प्रायोगिक तत्त्वावरील योजनेचा अनुभव लक्षात घेऊन संपूर्ण शहरात ही योजना राबवण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. प्रायोगिक तत्त्वार या पाच प्रभागांमध्ये साडेपाच हजार मीटर बसवले जाणार असून त्यासाठीचा खर्च सोळा कोटी रुपये आहे. एका मीटरसाठी सत्तावीस ते तेहेतीस हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मीटरसाठी येणारा हा खर्च महापालिका करणार आहे.
शहरातील नागरिकांसाठी चोवीस तास पाणी आणि सर्व भागांमध्ये पाण्याचे समान वाटप ही योजना राबवायची असली, तरी त्याबाबत गेली चार वर्षे फक्त चर्चा व वाद सुरू आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत सल्लागार नेमणे, प्रायोगिक तत्त्वावरील योजनेसाठी अहवाल तयार करणे यासह अन्यही कामे पूर्ण झाली आहेत. दोन प्रभागांसाठी निविदा निघाल्यामुळे ही प्रक्रिया आता काही प्रमाणात तरी मार्गी लागेल.