पुणे: किनारपट्टीचा भाग वगळता पुढील दोन दिवस राज्यभरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ परिसरात हवेची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रिय स्थितीपासून कर्नाटकपर्यंत द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही द्रोणिका रेषा वातावरणाच्या खालच्या स्तरातील निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे. राज्यात आग्नेय दिशेने बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस किनारपट्टी वगळता राज्याच्या अन्य भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून विदर्भात गारपीट होत आहे. या गारपिटीपासून विदर्भाला दिलासा मिळणार आहे. आज, शनिवारपासून पुढे विदर्भात गारपीट होण्याची शक्यता नाही.

हेही वाचा >>>घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण

पारा चाळीशीच्या आत

राज्यभरात काहीसे ढगाळ वातावरण असल्यामुळे कमाल तापमानाचा पारा मालेगावचा अपवाद वगळता चाळीशीच्या आत राहिला. शुक्रवारी मालेगावमध्ये राज्यातील सर्वाधिक ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात अवकाळी, गारपीट, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान सरासरी ३३.० अंशांवर राहिले. मराठवाड्यात सरासरी ३५.५, मध्य महाराष्ट्रात सरासरी ३८.० आणि किनारपट्टीवर पारा सरासरी ३३.० अंशांवर राहिला.