scorecardresearch

गव्हाच्या आयातीचा तूर्तास निर्णय नाही! ; दिवाळीपर्यंत दरवाढ टाळण्यासाठी सक्तीची निर्यात बंदी

देशभरातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या घाऊक विक्रीचे दर दर्जानुसार २३ ते २७ रुपये आहेत.

गव्हाच्या आयातीचा तूर्तास निर्णय नाही! ; दिवाळीपर्यंत दरवाढ टाळण्यासाठी सक्तीची निर्यात बंदी

पुणे : देशात तूर्तास गव्हाच्या आयातीबाबत कोणताही निर्णय होणार नाही. दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून निर्यातीवर कठोर निर्बंध घातले जात आहेत. दिवाळीपर्यंत बाजारातील गव्हाचे दर स्थिर ठेवण्यासाठी गहू, पीठ, मैदा, रव्याची निर्यात अपवादात्मक परिस्थितीत केंद्राच्या परवानगीने करता येणार आहे. सध्या गव्हाचे घाऊक दर २३ ते २७ रुपये इतके आहेत. किरकोळ विक्रीचे दर २९ ते ३४ रुपयांपर्यंत आहेत, अशी माहिती गहू, पीठ, रवा, मैद्याच्या निर्यातदारांनी दिली आहे.

देशभरातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या घाऊक विक्रीचे दर दर्जानुसार २३ ते २७ रुपये आहेत. किरकोळ विक्रीचे दर २९ ते ३४ रुपयांपय्र्ंत आहेत. सध्याचे दर तेजीतच आहेत. पण, किमान आहेत ते दर दिवाळीपर्यंत स्थिर ठेवण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. सणासुदीच्या काळात आणि विशेषकरून दिवाळीत दरवाढ झालीच तर सरकार आपल्या खाद्य महामंडळाच्या गोदामातील गव्हाची खुल्या बाजारात विक्री करू शकते. पण, कोणत्याही परिस्थितीत आयात शक्य नाही. गहू आयात झाला,तर गव्हाचे दर धडाधडा कोसळतील, शेतकरी त्याला मोठा विरोध करतील. त्यामुळे सध्या कठोर निर्यात बंदी इतकीच उपाययोजना केंद्र सरकार करू शकते, असे पीठ, मैदा, रव्याचे निर्यातदार अनुप शहा म्हणाले. जागतिक परिस्थितीचा परिणाम म्हणून गव्हाच्या दरात तेजी येऊन देशातून निर्यातीत प्रचंड वाढ झाली. केंद्र सरकारलाही आपल्या कल्याणकारी योजनांसाठी गहू मिळेना, त्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्राने तेरा मेपासून गव्हाची निर्यात बंदी केली. देशातील व्यापाऱ्यांनी गहू निर्यात बंद होताच गव्हाचे पीठ, रवा, मैद्याच्या निर्यातीत प्रचंड वाढ केली. ही निर्यात इतकी प्रचंड होती की, मागील वर्षीच्या तुलनेत २७४ टक्के वाढ झाली. मागील वर्षी सुमारे २४७० लाख डॉलर किंमतीच्या पिठाची निर्यात झाली होती. यंदा फेब्रुवारी ते जुलैच्या पाहिल्या आठवडय़ापर्यंत २१२ कोटी डॉलर किंमतीची निर्यात झाली होती. त्यामुळे झोपलेले सरकार पुन्हा जागे झाले आणि ८ जुलैला पीठ, मैदा, रव्याच्या निर्यातीवरही बंदी निर्णय घेतला. ही बंदी १२ जुलैपासून अमलात आली. आता १४ ऑगस्टपासून निर्यातबंदीचे निकष अधिक कडक केले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.