दरवर्षी विसर्जन मिरवणुकीला होणारा विलंब लक्षात घेता मानाच्या सर्व मंडळांनी मिरवणुकीत दोन-दोन पथके आणावीत, असा प्रस्ताव तयार केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी मंगळवारी दिली.
पुणे महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळांची बैठक असा कार्यक्रम मंगळवारी महापालिका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी रानडे बोलत होते. महापौर वैशाली बनकर, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सभागृहनेता सुभाष जगताप, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची या वेळी प्रमुख  उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर बनकर यांनी, तर सूत्रसंचालन नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.
पुण्यातील गणेशोत्सव शांततेतच होतो फक्त विसर्जन मिरवणूक आणि होणारा विलंब याचा विचार करणे आवश्यक आहे, असे रानडे यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, की मिरवणूक आटोपशीर कशी होईल यासाठी सर्वानीच प्रयत्न व सहकार्य करणे गरजेचे आहे. मानाचे सुरुवातीचे पाच आणि रात्री येणारे तीन या आठ मंडळांसमोर पाच-पाच पथके असतात. त्यातील एकेका ढोल-ताशा पथकात वादक, कार्यकर्ते वगैरे सर्व मिळून पाच-पाचशे जणांचा सहभाग असतो. शिवाय या प्रत्येक पथकाला लक्ष्मी रस्त्यावरील प्रत्येक चौकात अर्धा तास वादन करायचे असते. त्यामुळे मिरवणूक लांबते.
मानाच्या मंडळांनी प्रत्येकी दोन पथके मिरणुकीत आणावीत असा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. मंडळांनी त्यानुसार पथके आणावीत, असेही आवाहन रानडे यांनी केले. ढोल-ताशा पथकांमुळे गेल्यावर्षी मिरवणूक लांबली अशी टीका झाली. त्यांचा मोठा लवाजमा असतो. त्यामुळे एकेका पथकात किती वादक आणि किती वाद्य असावीत यावरही काही तरी बंधन घालण्याची वेळ आली आहे. या पथकांनी केळकर, कुमठेकर, शास्त्री, कर्वे आणि टिळक या रस्त्यांवरील मंडळांच्या मिरवणुकीत सहभाग घेतल्यास गर्दी विभागली जाईल, असेही ते म्हणाले.
एक खिडकी योजना
मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. महापालिकेतर्फे मंडपांसाठी परवानगी दिली जाते. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महापालिकेचा एक निरीक्षक दुपारी तीन ते पाच या वेळेत या परवानगीसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती राजेंद्र जगताप यांनी या वेळी दिली.
मंडळांकडून आलेल्या विविध सूचनांची दखल पोलीस घेतील. आम्ही त्रास देणारे शासकीय अधिकारी नाही, तर मंडळांना मदत करणारे हितचिंतकच आहोत, असे गुलाबराव पोळ म्हणाले.