पुणे : पादचारी महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून मोटारीसह तीन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. अमर चिलू कांबळे (वय २७, रा. वडगाव शेरी, मूळ रा. नेवासा, जि. अहमदनगर), वैभव मारुती शेलार (वय ३२, रा. खामगाव, जुन्नर, जि. पुणे), विराज निवृत्ती नवघिरे (वय २६, रा. उत्तर सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. खराडी बाह्यवळण मार्गावर आठवड्यापूर्वी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पादचारी महिलेकडील सोन्याचे दागिने मोटारीतून चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा चंदननगर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.

आरोपी कांबळे, शेलार आणि नवघिरे यांनी मोटारीतून येऊन महिलांचे दागिने हिसकावल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी अमित कांबळे आणि सुभाष आव्हाड यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून तिघांना पकडले. चोरट्यांकडून मोटार तसेच सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, उपनिरीक्षक दिलीप पालवे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे आदींनी ही कारवाई केली.