पिंपरीच्या संत तुकारामनगर भागातील एका कारंजाच्या उभारणीची मोठी गमतीदार गोष्ट आहे. नको तो ‘ठिय्या’ झालेल्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढून १० लाख रुपये खर्च करून तेथे कारंजे बांधण्यात आले. वर्षांनुवर्षे वसलेल्या टपऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा स्थानिक नगरसेवकाचा हेतू त्यामागे होता. प्रत्यक्षात मात्र भलतेच झाल्याने त्याचा हेतू काही साध्य झालाच नाही. उलटपक्षी, टपऱ्यांच्या जागी वेगळीच अतिक्रमणे झाली.. कारंजावर झालेला खर्च पाण्यात!
संत तुकारामनगर म्हणजे ‘टपऱ्यांचे आगर’! तिथे महेशनगरच्या कोपऱ्यावर खाऊगल्लीसमोरच हे कारंजे बांधलेले आहे. तिथे अनेक वर्षांपासून पानाची टपरी, पंक्चरचे दुकान, वडापावच्या गाडय़ा होत्या. व्यायामाकरिता ‘डबल बार’ होता. त्यामुळे हमखास गर्दीचे हे ठिकाण अनेक टुकारांच्या ‘फुका-फुकी’ चा ठिय्याही बनला होता. अशात, येथील एक बंद टपरी नेहरुनगरच्या काही पोरांनी घेतली व तेथे ‘कॅरम हाऊस’ सुरू केले. अल्पावधीत तेथे पत्यांचे डावही सुरू झाले, दारूच्या पाटर्य़ा झडू लागल्या. तरुणांचे टोळके वाढले. तत्कालीन नगरसेवकाला हे आवडले नाही. भविष्यातील राजकीय धोका दिसू लागल्याने त्याने तक्रारीचा सूर काढला. पोरांनी दाद दिली नाही. ‘अण्णा’, ‘भाई’ त्यांच्या पाठिशी असतील आणि आपल्या सीटला धोका करतील, अशी शंका नगरसेवकाला सतावू लागली. अशा परिस्थितीत, अचानक अतिक्रमणविरोधी कारवाई झाली आणि एका दिवसात टपऱ्या भुईसपाट झाल्या. ही कारवाई नगरसेवकानेच केली, या संशयाने त्याचे कार्यालय फोडण्यात आले. प्रकरण वाढण्याची चिन्हे दिसताच वरिष्ठ पातळीवरून मिटवामिटवी झाली.
तेथे पुन्हा टपऱ्या पडू नयेत, तो टोळक्यांचा अड्डा होऊ म्हणून नगरसेवकाने सुशोभीकरणाच्या नावाने कारंजे बांधण्याचे ठरवले. अडचणींवर मात करत रडतखडत का होईना चकचकीत कारंज उभे राहिले. मात्र, नव्या नवलाईचे नऊ दिवस ठरले, काही दिवसांतच कारंजे बंद पडले. नेहमीप्रमाणे पालिकेनेही दुर्लक्ष केले. पुढे, साचलेल्या पाण्यात डास होऊ लागले, त्याचा नागरिकांना त्रास होऊ लागला. घाण साचल्याने दरुगधी होऊ लागली. आता कारंजाच्या अवतीभवती फलकबाजीची स्पर्धा दिसते. शिवाय ही चार चाकी गाडय़ांची हक्काची पार्किंग झाली आहे. त्यातही काहींचे वेगवेगळे उद्योग चालतात. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या कारंजाचा उपयोग झाला नाहीच. ते बांधल्याचा हेतू साध्य झाला नाही. एक अतिक्रमण निघाले, पण त्याच्या दुप्पट अतिक्रमणे होऊ लागली. इतका आटापिटा करून उपयोग काय झाला, असा प्रश्न विचारला जात आहे. उत्तर दिसते आहे- शून्य!
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2013 रोजी प्रकाशित
एका कारंजाची अशीही गोष्ट!
संत तुकारामनगर म्हणजे ‘टपऱ्यांचे आगर’! तिथे महेशनगरच्या कोपऱ्यावर खाऊगल्लीसमोरच हे कारंजे बांधलेले आहे.

First published on: 11-12-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is story of one fountain