कोणत्याही कामासाठी रस्त्यांची खोदाई केली जात असेल, तर तेथे कामाची माहिती देणारे फलक लावले 19khod2जातील तसेच खोदाई केलेले रस्ते त्वरित पूर्ववत केले जातील, अशा घोषणा करून शहरात रस्ते खोदाई जोरात सुरू करण्यात आली असली, तरी फक्त खोदाईच जोरात असून रस्ते पूर्ववत करण्याकडे मात्र महापालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
पावसाळय़ात रस्ते खोदाईची सर्व कामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे बंद झालेली खोदाईची कामे पुन्हा सुरू करण्यात आली असून खोदाईसाठी थांबलेली नवी कामेही जागाजोगी सुरू करण्यात आली आहेत. ही कामे विकासाची कामे असल्यामुळे त्यांना नागरिकांचा आक्षेप नसला, तरी या कामांसाठीचे नियम मात्र पाळले जात नसल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. खोदाई कोणत्या कामासाठी सुरू आहे, ते काम किती दिवस चालणार आहे तसेच कोणत्या ठेकेदाराने काम घेतले आहे, कामाशी संबंधित अधिकारी कोण आहे, काम पूर्ण करण्याची मुदत किती आहे वगैरे तपशील असलेला फलक कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. मात्र ठेकेदारांकडून असे फलक लावले जात नसल्याची तक्रार आहे.
खोदलेल्या रस्त्यांच्या पुनर्डाबरीकरणासाठी तसेच रस्ते पूर्वस्थितीत आणण्यासाठी महापालिका ज्या कामासाठी खोदाई केली जात आहे त्याच्याशी संबंधितांकडून शुल्क आकारते. हे शुल्क भरल्याशिवाय खोदाईसाठी परवानगी दिली जात नाही. मात्र, हे शुल्क भरल्यानंतरही रस्ते पूर्ववत केले जात नसल्याचे शहरात दिसत आहे. विविध मोबाइल कंपन्या त्यांच्या केबल टाकण्यासाठी सर्वत्र खोदाई करत असून महापालिकेच्या कामांसाठीही खोदाई सुरू आहे. ठिकठिकाणी प्रमुख चौकांमध्ये तसेच अन्य रस्त्यांवर सुरू असलेल्या या खोदाईमुळे चांगले रस्ते उखडले जात आहेत. अनेक रस्त्यांचे नव्याने करण्यात आलेले डांबरीकरणही खोदाईमुळे वाया गेले आहे. तसेच अनेक ठिकाणी नव्याने इंटर लॉकिंग ब्लॉक बसवून पदपथ तयार करण्यात आले आहेत. असे नवे पदपथही उखडण्यात आले आहेत.
विविध कामांसाठी खोदाई केलेले रस्ते महापालिकेतर्फे लगेच पूर्ववत केले जातील, ही महापालिकेची फक्त घोषणाच ठरली आहे. या घोषणेनुसार रस्ते पूर्ववत होतील असे नागरिकांना वाटत होते; पण घोषणेची अंमलबजावणी होताना मात्र कोठेही दिसत नाही. त्यामुळे सध्या खोदले जात असलेले व यापूर्वी खोदलेले रस्ते पूर्ववत कधी होणार हे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.