‘पाटलाचा वाडा’ ही कल्पना शहरवासीयांना आता फक्त चित्रपटात किंवा एखाद्या आनंदमेळा, गावची जत्रा अशा उपक्रमात पाहायला मिळते. पुणेकरांसाठी मात्र लवकरच एक भव्य असा पाटील वाडा खुला होत आहे. या वाडय़ाचे वैशिष्टय़ म्हणजे इथे ग्रामीण जीवनाची ओळख करून घेता येईल, तसेच येथे छत्रपती शिवाजीमहाराज आणि पेशवेकाळाच्या इतिहासाचा अभ्यासही करता येईल.
कात्रज येथे असलेल्या राजीव गांधी उद्यानाजवळ असलेला एक भव्य तलाव पुणेकरांना माहीत आहे. कात्रज तलाव म्हणून तो ओळखला जातो. या तलावाच्या वरच्या बाजूला आणखी एक तलाव आहे. त्याचे नाव ‘नानासाहेब पेशवे तलाव’ असे आहे. येथे छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून, तेथे आता एक भव्य असे संगीत कारंजेही उभारण्यात आले आहे. याच तलावाच्या परिसरात चार हजार चौरसफूट जागेवर इतिहास अभ्यास केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून, केंद्राच्या परिसरात शोभेची झाडे लावणे व अन्य काही कामे आता बाकी आहेत. स्थानिक नगरसेवक आणि मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प विकसित होत असून, सन २०११ पासून टप्प्याटप्प्याने सुरू झालेले काम लवकरच पूर्णत्वास जाईल.
या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना तसेच इतिहासप्रेमींना केंद्रात आल्यानंतर विविध प्रकारची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. केंद्राच्या तळमजल्यावर शिवाजीमहाराजांच्या तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर या आणि अशा अनेक सवंगडय़ांचे जीवनचरित्र त्यांच्या भव्य छायाचित्रांसह प्रदर्शित केले जाणार आहे. तसेच पेशवे तलावाचा संपूर्ण इतिहासही फिल्मच्या माध्यमातून दाखवण्याची व्यवस्था येथे असेल. एकावेळी शंभर प्रेक्षक तेथे बसू शकतील एवढे प्रेक्षागृह बांधण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर शिवरायांच्या आणि पेशव्यांच्या इतिहासाचा अभ्यास करता येईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. शिवरायांच्या जीवनावर आजवर जेवढे साहित्य प्रकाशित झाले आहे ते सर्व या ठिकाणी अभ्यासासाठी उपलब्ध असेल, अशी माहिती वसंत मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
हे अभ्यास केंद्र ‘पाटील वाडा’ या स्वरूपात उभारण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेला पाटील वाडा आता पुणेकरांना कायमस्वरूपात पाहता येणार आहे. मूळ इमारत विटा व सिमेंटमध्ये उभारण्यात आली असली, तरी तो वाडा वाटेल अशी घडण करण्यात आली आहे. घडीव दगड, कौले आणि लाकडाचा वापर कलात्मक पद्धतीने करण्यात आल्यामुळे ही इमारत असली, तरी तो दुमजली वाडा वाटतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– कात्रज तलाव परिसरात अभ्यास केंद्र.
– चार हजार चौरस फूट वाडास्वरूपातील बांधकाम.
– ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे केंद्र.
– इतिहासाच्या अभ्यासासाठी पुस्तके, ग्रंथ, फिल्म.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To study history now use patlacha vada
First published on: 05-02-2014 at 03:10 IST