‘‘आजची शिक्षण व्यवस्था ही नागरिक घडवण्याची प्रक्रिया राहिली नसून ती पैसे मिळवण्याचे यंत्र झाली आहे. आजची पिढी गुणवान आहे; मात्र त्याला दिशा देण्याची गरज आहे. त्यासाठी देशाला ‘व्हिजन’ची आवश्यकता आहे. आवाज माझा असला, तरी विचार आजच्या तरुणाईचे आहेत,’’ असे वक्तव्य गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मोदी यांनी ‘शिक्षण आणि विकास’ या विषयावर विद्यार्थ्यांशी रविवारी संवाद साधला.
गुजरातमधील प्रगतीची उदाहरणे देत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशाची पीछेहाट झाल्याचे मोदी यांनी सांगितले. या वेळी मोदी म्हणाले, ‘‘मनुष्यबळ विकास हे देशाच्या विकासाचे मूळ आहे. मात्र, आपल्याकडे मनुष्यबळाच्या विकासावर लक्ष दिले जात नाही हे दुर्भाग्य आहे. आज देशातील तरुणांना नोक ऱ्या मिळत नाहीत. मात्र, गुजरातमध्ये बेरोजगारी अत्यल्प आहे. शिक्षणाला कोणत्या दिशेने न्यायचे हे ठरवण्याची गरज आहे. विकासाच्या अनुषंगाने शिक्षण देण्याची गरज आहे. एके काळी शिक्षणात भारत चीनच्या पुढे होता आता मात्र चीन आपल्या पुढे गेला आहे आणि आपल्याला आपले होते ते स्थानही टिकवून न ठेवता आपली पीछेहाट झाली आहे. म्हणून विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी चीन आणि रशियाला जावे लागते.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगल्या शिक्षकांची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सगळ्या जगाला गुणवत्तापूर्ण शिक्षक भारत पुरवू शकेल इतकी गुणवत्ता देशातल्या तरुणांकडे आहे. मात्र, शिक्षक प्रशिक्षण ही प्राथमिकता नाही. ज्या प्रमाणे आयआयएम मध्ये कॅम्पस इंटरव्ह्य़ूमधून जगभरातल्या कंपन्या त्यांच्यासाठी आवश्यक असणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निवडतात. त्याचप्रमाणे एखादी शिक्षकांना प्रशिक्षण देणारी संस्था उभी राहावी आणि त्यामाध्यमातून जगामध्ये भारतीय शिक्षक असावेत.’’
या वेळी मोदी यांनी फर्ग्युसनच्या वसतिगृहातील सावरकरांच्या खोलीला भेट दिली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस शाम जाजू, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण परदेशी, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी उपस्थित होते.
मोदींनी भाषणामध्ये उपस्थित केलेले मुद्दे –
– देशात निराशेचे वातावरण आहे, त्यातून देशाला बाहेर काढण्याची गरज आहे.
– आधुनिक शिक्षणाचा अवलंब केला, तर देशाची खूप प्रगती होऊ शकते. मात्र, आधुनिकता हवी, पाश्चिमात्यीकरण नको.
– गुणवत्ता असूनही सैन्यातील मोठी पदे रिक्त का राहतात. शस्त्रांच्या बाबतीत भारत स्वतंत्र का नाही?
– मोठा सांस्कृतिक वारसा असूनही पर्यटनाकडे दुर्लक्ष का? प्रशिक्षित गाइड का नसतात?
– शेतीप्रधान देशामध्ये शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान का नाही? शेतक ऱ्यांना प्रशिक्षण देणारे स्वतंत्र विद्यापीठ का नाही?
– आपल्याकडे प्रगती नाही कारण गुलामगिरीच्या मानसिकतेतून आपण बाहेर पडलो नाही.
– पोलिसांना आपण नावे ठेवतो, पण आपल्याकडे पोलिसांना सायबर क्राइमसारख्या नव्या अडचणींना तोंड देण्यासाठी तेवढे सक्षम प्रशिक्षण दिले जाते का? पोलिस किंवा सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी शाळेपासून शिक्षण का नाही?