प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी यांच्याकडून वेळोवेळी संपाचे हत्यार उपसण्यात येते. हा राज्य सरकारला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याची टिपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवीत केली. डॉक्टरांचा आजही शहरी भागात जाण्यासाठीच ओढा असून ग्रामीण व आदिवासी भागात जायला कोणी तयार होत नाही, याकडे लक्ष वेधून विकासाच्या मापदंडात आरोग्याला स्थान दिले जात नाही, अशी खंत अजितदादांनी व्यक्त केली.
राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. औंध रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, जयदेव गायकवाड, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक कांचन जगताप, उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक प्रशांत शितोळे, कैलास थोपटे, नाना काटे, सनी ओव्हाळ आदी उपस्थित होते. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या अभियानात काही प्रमाणात त्रुटी असू शकतात. मात्र, त्यात सुधारणा करून पुढे जाऊ, असे आवाहन अजितदादांनी  केले.
दुष्काळग्रस्तांसाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत, असे सांगत त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, एकीकडे दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. दुसरीकडे, मोर्चे आंदोलने करून शासनास वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. मुंबईत उपचार मिळाले नाही म्हणून एकाचा जीव गेल्याचे आपण वाचले. रुग्णांच्या जीवाशी खेळू नका, सामान्यांना वेठीस धरू नका. एलबीटीमुळे त्रास होत असेल, आपल्याला मान्य आहे. मात्र, कोणता तरी कर भरावाच लागणार आहे. कर नसतील तर विकासकामांसाठी पैसे कुठून आणणार. काही केले तरी पैशाचे सोंग आणता येत नाही. अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणे आरोग्यरक्षण महत्त्वाची गरज आहे. खूप पैसा असला आणि आरोग्य चांगले नसल्यास उपयोग काय. वाढत्या औद्योगिकीकरणात आरोग्य सेवा उत्तम असली पाहिजे. सध्याच्या काळात खासगी रुग्णालयांचा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने शासकीय रुग्णालये सामान्य नागरिकांच्या दृष्टीने मोठा आधार आहे. जिल्हा रुग्णालये सक्षम करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून वेळप्रसंगी आणखी निधी उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.