मोटार नो पार्किंगमध्ये लावली किंवा सिग्नल पाळला नाही.. तर बरेच जण सहसा दंड कसा वाचवता येईल याची पळवाट शोधतात, पण शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांना रविवारी सीटबेल्ट न लावता वाहन चालवत असल्याबद्दल पोलिसाने अडविले. ‘साहेबांना’ अडवल्याचे लक्षात आल्यावर लागलीच त्यांना सलाम ठोकला, पण पांढरे यांनी सीटबेल्ट न लावल्याबद्दल व मोटारीची कागदपत्रे बाळगली नसल्याबद्दलही दोनशे रुपये दंड भरलाच, शिवाय पोलीस कर्मचाऱ्याने कर्तव्य पाळन केल्याबद्दल त्याला बक्षीसही जाहीर केले.
पांढरे हे रविवारी दुपारी बाणेर येथून खासगी मोटारीने येत होते. बाणेर चौकात आल्यानंतर त्यांना पोलीस कर्मचारी उमेश देवकर यांनी अडविले. मोटारीच्या जवळ गेल्यानंतर देवकर यांना मोटारीत पांढरे असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पांढरे यांना सॅल्यूट ठोकला. आपली मोटार का अडवली, अशी विचारणा केली असता त्यांनी सीटबेल्ट लावला नसल्याचे देवकर यांनी सांगितले. पांढरे यांच्याकडे मोटारीची कागदपत्रेही नव्हती. त्यामुळे वाहन चालवताना सीटबेल्ट न लावणे आणि कागदपत्रे न बाळगल्याबद्दल त्यांनी दोनशे रुपये दंड भरून पावती घेतली.
देवकर हे दुपारच्या कडक उन्हात जागरुकपणे कर्तव्य बजावत असल्याबद्दल त्यांना बक्षीस जाहीर केले. याबाबत पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वाहतुकीच्या नियमांचे सर्वानीच पालन केले पाहिजे. वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची आपण काळजी घेतो. नेहमी सीटबेल्ट लावतो, पण काल अनावधानाने तो लावायचे विसरून गेलो. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने सीटबेल्ट न लावल्याचे लक्षात आणून दिले. नियम सर्वाना सारखे असतात, त्यामुळे दोनशे रुपये दंड भरला.