पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (pmpml) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धडाकेबाज निर्णयांनी चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढे आणि पुण्याच्या नगरसेवकांमध्ये आज एक वेगळाच ‘सामना’ पाहायला मिळाला. महापालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीवेळी फक्त नगरसेवकांनाच सभागृहात प्रवेश असेल असा आदेश काढणारे या निवडणुकांचे पीठासीन अधिकारी तुकाराम मुंढे यांनाच एका नगरसेवकाने रोखले. तुम्हीच कशावरून तुकाराम मुंढे? असा सवाल विचारात त्यांच्या प्रवेशाला आक्षेप घेतला. त्यामुळे पुढील काळात ‘कडक शिस्ती’साठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक आज पार पडली. मात्र यंदा विषय समित्यांच्या सभासदांव्यतिरिक्त अन्य कोणालाही महापालिकेत प्रवेश नसेल, असा आदेशच पीठासीन आधिकारी तुकाराम मुंढे यांनी काढला होता. विधी समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु होताच, तुम्हीच तुकाराम मुंढे कशावरून, असा आक्षेप नगरसेवक अविनाश साळवे यांनी घेतला. यावर तुकाराम मुंढे यांनी ओळखपत्र दाखवले. मी पीठासीन आधिकारी असून मला अशी विचारणा करणे योग्य नाही, असे त्यांनी सुनावले.

पुणे महानगरपालिकेमध्ये विषय समित्यांच्या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांनी यांची नियुक्ती विभागीय आयुक्तांमार्फत करण्यात आली होती. त्यानुसार या विषय समित्यांच्या निवडणुकीला सभासदांव्यतिरिक्त अन्य कोणालाही सभागृहामध्ये प्रवेश दिला जाणार नसून सभासदाकडे ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आल्याचा आदेश त्यांनी काढला. या आदेशामुळे या विषय समित्यांच्या निवडणुकीला दरवर्षी महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेते उपस्थित राहतात. मात्र त्यांच्या निर्णयामुळे त्यांना उपस्थित राहता आले नाही. आज विधी समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यावर नगरसेवक अविनाश साळवे यांनी तुम्हीच का तुकाराम मुंढे, असा प्रश्न विचारत आम्ही फक्त वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. त्यावर तुकाराम मुंढे यांनी स्वत:जवळील लगेच ओळखपत्र दाखवले. मी पीठासीन आधिकारी असून मला हे विचारणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तर आम्हीही जनतेमधून निवडून आलो आहोत. तुम्हीही आमच्याकडे ओळखपत्र मागणे योग्य नाही. तुम्ही सवंग प्रसिद्धीसाठी आजवर निर्णय घेत असल्याचे साळवे म्हणाले. दरम्यान, मुंढे यांच्या निर्णयावर महापौर मुक्ता टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीवेळी महापौर आणि उपमहापौर सभागृहात उपस्थित राहत होते. मात्र यंदा प्रशासनाने त्यांचे काम केले आणि आम्हीही आमचे काम केले असून, यापुढील काळात लोकप्रतिनिधींची दखल घ्यावी, असे त्या म्हणाल्या.