साध्या कागदावर रंगीत झेरॉक्स काढून बनावट नोटा तयार करत बाजारात खपविणाऱ्या सख्ख्या बहिणींना निगडी पोलिसांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून ४५ हजार किमतीच्या पाचशे, शंभर, पन्नास रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या बनावट गणपती, नवरात्रोत्सवादरम्यान चलनात आणण्याची योजना असल्याचे तपासात समोर आले आहे.
सविता ओमचंद कांडगा (वय २४) आणि बबिता ओमचंद कांडगा (वय २२, दोघी रा. पारसी चाळ, देहूरोड) अशी अटक केलेल्या दोघींची नावे आहेत. भक्ती-शक्ती चौकात हातगाडीवर रजिया बानकरी यांच्याकडून या दोघींनी पाचशे रुपये देऊन चावीचे किचेन घेतले. त्यांना नोटेचा संशय आल्याने बानकरी यांनी आरडाओरडा केल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन यांच्याकडे तपास केला असता अठराशे पन्नास रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या, अशी माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.
पोलिसांनी दोघींच्या देहूरोड येथील घरी छापा टाकला असता आणखी ४३ हजार ३२० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्याच बरोबर बनावट नोटा बनविण्यासाठीचे संगणक, स्कॅनर, रंगीत झेरॉक्स काढणारे प्रिन्टर या गोष्टी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या नोटांमध्ये पाचशे, शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. सविता ही पदवीधर असून बबिता ही दहावी शिकलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रंगीत झेरॉक्स काढून त्या बनावट नोटा तयार करत आणि ज्येष्ठ नागरिक, छोटे दुकानदार, व्यावयायिक यांच्याकडे नोटा चलनात आणत होत्या. नोटांसाठी त्या साधाच कागद वापर होत्या. गणपती आणि नवरात्र उत्सव जवळ आल्याने या काळात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी तयारी केल्याचे तपासात त्यांनी सांगितले आहे. या दोघींना ही पद्धत कोणी शिकवली. यामागे आणखी कोण आहे का याचा तपास सुरू आहे, असे उमाप यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मारुती मोहिते हे करत आहेत.