जेजुरी येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा बंधाऱ्यात बुडून सोमवारी दुपारी मृत्यू झाला. जेजुरी येथील कडेपठारजवळील बंधाऱ्यामधील पाण्यात मुलांचा मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला.
अनुराग रमेश सिंह (वय १६, रा. जुनी जेजुरी) आणि आशिष ग्यानेश मिश्रा (वय १६, रा. खोमणे वस्ती, जेजुरी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग आणि आशिष सोमवारी दुपारी एक वाजता शाळा सुटल्यानंतरही घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला; पण रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध न लागल्यामुळे जेजुरी पोलीस ठाण्यात दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास कडेपठार रस्त्यावरील एका बंधाऱ्याजवळ नागरिकांना कपडे आणि शाळेचे दप्तर दिसून आले. लोकांनी पाण्यात पाहिले असता दोन मृतदेह तरंगताना आढळले. त्यांनी तत्काळ जेजुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे घटनास्थळी दाखल झाले. हा बंधारा मुख्य रस्त्यापासून आतमध्ये असल्यामुळे सोमवारी हा प्रकार उघडकीस आला नव्हता. आशिषचे वडील जेजुरी येथील एका कंपनीत कामास आहेत. तर, अनुरागचे वडील किराण दुकान चालवितात. गणेशोत्सव सुरू असल्यामुळे मुले गणपती पाहण्यास गेली असावीत, अशी शक्यता कुटुंबीयांना वाटत होती. मात्र, आज दुपारी दोघांचे मृतदेह पाहून त्यांच्या पालकांनी हंबरडा फोडला.