पुणे दुचाकींचेच शहर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षांत शहरातील वाहनांची एकूण संख्या २६ लाख ६६ हजार झाली असून त्यात मोटारसायकली, स्कूटर आणि मोपेड मिळून २० लाख दुचाकी वाहने आहेत. महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
सन १०१३-१४ या वर्षांचा पुणे शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल महापालिकेच्या मुख्य सभेला सोमवारी सादर करण्यात आला. या अहवालात शहरात नोंदणी झालेल्या वाहनांचा सविस्तर तपशील देण्यात आला असून त्या माहितीनुसार शहरातील स्वयंलचित दुचाकींची संख्या १९ लाख ९६ हजार ४३५ आहे. त्यात मोटारसायकलींची संख्या १४ लाख ७४ हजार, स्कूटरची संख्या तीन लाख २६ हजार आणि मोपेडची संख्या एक लाख ९४ हजार आहे. या स्वयंलचित दुकाचींसह कार, जीप, रिक्षा, ट्रक, प्रवासी वाहतूक करणारी वाहने आदी मिळून शहरातील एकूण वाहनांची संख्या २६ लाख ६६ हजार ४८८ इतकी आहे. सन २०११ पासून शहरातील एकूण वाहनांच्या संख्येत दरवर्षी दोन लाखांनी वाढ होत असून यंदाही दोन लाख वाहने एका वर्षांत वाढली आहेत.
शहराच्या वाहतुकीसाठी महापालिकेने सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन) तयार केला आहे. या अहवालानुसार वाहनांची सरासरी गती प्रतितास ३० किलोमीटर असणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले, तरी सद्यस्थितीत ही गती प्रतितास १८ किलोमीटर इतकी आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या फेऱ्यांचेही उद्दिष्ट ८० टक्के असले, तरी सद्यस्थितीत ते १८ टक्केच आहे. पुण्यातील फक्त पावणेपाच टक्के रस्त्यांच्या कडने आता सायकल मार्ग आहेत आणि उद्दिष्ट १०० टक्क्यांचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गांडूळखत प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प आणि पर्जन्यजल संधारण यापैकी कोणताही एक प्रकल्प राबवल्यास मिळकत करात पाच टक्के व दोन वा तिन्ही प्रकल्प राबवले असल्यास करात दहा टक्के सवलत दिली जाते. शहरात अशा मिळकतींची संख्या २९ हजार ९७७ इतकी आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सौरऊर्जेवर चालणारी विद्युत प्रणाली बसवण्यात आली असून त्याद्वारे रोज १०० युनिट वीज तयार केली जाते.
महापालिकेने विकसित केलेल्या शहरातील उद्यानांची संख्या आता ११४ झाली असून सर्वाधिक १८ उद्याने ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात, तर १६ उद्याने सहकारनगर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two wheeler eco report pmc
First published on: 29-07-2014 at 03:02 IST