ते दोन बाईकवरचे प्रवास.. म्हटलं तर बरंच साम्य अन् म्हटलं पूर्णपणे भिन्न.. तरी त्या दोघांमधील समानधागा म्हणजे- त्यांनी पेललेले आव्हान अन् या प्रवासाद्वारे त्यांनी केलेला विक्रम. शिवाय दोघेही पुणेकर! एकाने आठ देशांमधील १७ हजार किलोमीटरचा प्रवास एकटय़ाने पूर्ण केला, तर दुसऱ्याने आपल्या संघासह पुणे-बंगळुरू-पुणे हा १६७० किलोमीटरचा प्रवास एका दमात, २२ तासांत पार केला.. सतीश पाटील आणि रोहन पानघंटी या तरुणांची ही कहाणी- आश्चर्य वाटायला लावणारी आणि तरुणांना वेगळी आव्हाने पेलण्याची हिंमत देणारी.
सतीश पाटील यांचा प्रवास सर्वानाच अंचबीत करणारा आहे. पाटील यांनी बुलेटवरुन १७ हजार किलोमीटर अन् आठ देशांचा प्रवास केला आहे. त्यांच्या प्रवासाची सुरुवात बालगंधर्वपासून १८ ऑक्टोबरला झाली. पाटील यांनी ७१ दिवसांत आठ देश आणि १७ हजार किलोमिटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पुणे, भुतान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, मलेशिया आणि सिंगापूर असा हा प्रवास केला. निम्म्या प्रवासात त्यांच्यासोबत पुण्याचे इतर सहकारी होते. मात्र, येतानासुद्धा बाईकवर परतणारे ते एकटेच ठरले.
या प्रवासात त्यांनी या देशांमधील संस्कृती, त्यांचे दैनंदिन जीवन, विविध पद्धती याची ओळख करून घेतली आहे. कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था आणि नागरिकांशी भेटी दिल्या आहेत. खेडय़ांपाडय़ात त्यांनी मुक्कामही केले आहेत. त्यांच्या जेवण्यातील पद्धार्थाची व त्यांच दैनंदिन जीवन जवळून पाहिले. थायंलडमधील ७०० वर्षांपूर्वीचे ‘क्रबाच’ या झाड, कंबोडियातील ‘अंगकोर वाट’ अशा अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या, अभ्यासल्या.
त्यांना आलेले अनुभवही थरारक होते. म्यानमारमध्ये छोटय़ाशा गावात घरातच असलेल्या खनिज तेलाच्या विहिरी, भारत-म्यानमारच्या सीमेवर अतिरेक्यांच्या गावातून केलेला प्रवास, अनेक ठिकाणी स्थानिक गुन्हेगारांची भीती, परतताना झालेला अपघात. असे अनेक प्रसंग अनुभवत त्यांनी हा थरारक प्रवास पूर्ण केला.
रोहन पानघंटी याच्या टीममध्ये इतर तीन तरूण आणि एक तरुणी (जयप्रकाश मुळे, अनुली मुळे, नरेश तांबडे, विवेक कांबळे) असे सहभागी झाले होते. त्यांनी नुकताच हा प्रवास पूर्ण केला. पुणे-बंगळुरू-पुणे हा १६७० किलोमीटरचा प्रवास एका दमात पूर्ण केला. संपूर्ण प्रवासात थंडी होतीच. वाटेत अवेळी आलेल्या पावसानेही साथ केली. प्रवासाला सुरुवात झाली ३ जानेवारीला पहाटे ३ वाजता. थेट कोल्हापूर, पुढे बेळगाव. मात्र, धारवाडजवळ एका बाईकमध्ये बिगाड झाला आणि त्यांचा एक साथीदार कमी झाला. पण वेळेचे गणित आणि ठरल्या प्रमाणेच प्रवास करायाचा असल्यामुळे रोहन आणि विवेक कांबळे यांनी पुढचा प्रवास सुरु केला. ते बंगळुरूला १३ तासांत पोहचण्यात ते यशस्वी झाले. ते पुन्हा तेथून माघारी फिरले. पण लगेचच रोहनच्या बाईकचे पुढचे ब्रेक तुटले. रोहन आणि कांबळेने ब्रेक नसलेल्या बाईकनेच परतीचा प्रवास केला. अखेरच्या टप्प्यात थंडीच्या कडाक्यामुळे हात जड पडून सूज आली होती. कराड ते शिक्रापूर हा प्रवास सर्वात खडतर झाला. डोक्याला चक्कर, पाय जड, डोळ्याला अंधारी आली होती. पुढचा टप्पा पार होणार का़, याबाबत चिंता होती. मात्र, हे आव्हान पेलले आणि विक्रम घडवला.
‘‘फक्त भारतीय संस्कृतीची माहिती असण्यापेक्षा इतर देशांतही काय सुरू आहे हे जाणून घेणे महत्वाचे. त्यांची जीनवपद्धती, संस्कृती पाहिली पाहिजे. भारत आणि या देशातील संस्कृती जवळपास सारखीच आहे. त्यांना भारतीयांबद्दल खूप आदर आहे. त्यांची देवांची पूजा करण्याची पद्धतही आपल्यासारखीच आहे. या संस्कृतीची देवाण-घेवाण होणे गरजेच आहे. माझा प्रवास हा त्याचाच एक प्रयत्न होता.’’
– सतीश पाटील
‘‘मला बाईक वरुन फिरण्याची आवडच आहे. आम्ही सामाजिक उपक्रमही त्यातून करतो. आता माझा ३६ तासांत २४०० किलोमीटरचा प्रवास मार्चमध्ये करण्याचा मानस आहे. फक्त शहरात गाडय़ा पळवणे यात शौर्य नाही, तुम्ही बाईक सलग किती वेळ चालवू शकता, यातून तुमच्या मता पणाला लागतात. इतर कोणाला असे रेकॉर्ड करायचे असेल तर त्यांना मदत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.’’
– रोहन पानघंटी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two youngsters two motorbike and two record
First published on: 31-01-2015 at 02:44 IST