उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल

अयोध्येत राम मंदिर निवडणुकांआधी उभारू, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आता सांगत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी दिलेली, काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, समान नागरी कायदा लागू करणे आणि राम मंदिर उभारणी आदी अनेक आश्वासने भाजपला बहुमत असूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे भाजपची आश्वासने २०१९ का २०५० च्या निवडणुकीसाठी?, असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपला केला. भाजपच्या एकंदरीत कारभारावरून ते केवळ स्वप्न दाखवत आहेत असे वाटते, असेही ते म्हणाले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. खासदार गजानन कीर्तिकर, संजय राऊत, श्रीरंग बारणे, आमदार नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर या वेळी उपस्थित होते. अयोध्येतील राम मंदिर उभारणी, वस्तू आणि सेवा कर, नाणार प्रकल्प अशा विविध मुद्दय़ांवर ठाकरे यांनी भाष्य केले.

ज्याप्रमाणे नोटबंदी एका क्षणात लागू केली, त्याप्रमाणे राममंदिर उभारणीचा निर्णय का घेत नाहीत? अशी विचारणा करून ठाकरे म्हणाले, भाजपने आता राममंदिर उभारणीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. परीक्षेचे निकाल वेळेवर न लागणे, पेपरफुटी अशी प्रकरणे झाकण्यासाठीच भगवद्गीता वाटपाचा विषय काढण्यात आला आहे. नाणार आणि समृद्धी महामार्ग हे दोन्ही विषय वेगळे आहेत. नाणरमधील रिफायनरीमुळे विध्वंस होणार असल्याने हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.